भारताची अव्वल खेळाडू सायना नेहवाल व उदयोन्मुख खेळाडू एच. एस. प्रणॉय यांनी एकेरीत तर ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा जोडीने दुहेरीत आपापले सामने जिंकून ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत विजयी प्रारंभ केला. मात्र, पारुपल्ली कश्यप व कदंबी श्रीकांत यांचे पुरुष एकेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. बर्मिगहॅम येथील बर्कले यार्ड एरिनात हे सामने होत आहेत.
जागतिक क्रमवारीत ५३ व्या स्थानावर असणाऱ्या इंडोनेशियाच्या बेलेट्रेक्स मनुपुट्टीवर विजय मिळवताना फार घाम गाळावा लागला नाही. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सायनाने आपल्या अनुभवाच्या जोरावर मनुपुट्टीचा २१-८, २१-१२ असा अवघ्या ३८ मिनिटात पराभव केला. साऊथ कोरियाची किम हयो मिनशी ऑलिंपिक कांस्यपदक विजेत्या सायनाचा दुसऱ्या फेरीत मुकाबला होईल. या दोन्ही खेळाडूंनी पात्रता फेरीतून मुख्य स्पध्रेत प्रवेश मिळवला आहे.
जगात पाचव्या स्थानी असलेल्या श्रीकांतला जागतिक क्रमवारीत १४ व्या स्थानी असलेल्या जपानच्या केंटो मोमोटा याच्याकडून १५-२१, २१-१२ व १५-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. १२ व्या स्थानी असणारा भारताचा प्रमुख खेळाडू पी. कश्यप यालाही पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. सहाव्या क्रमांकावरील चायनीज तैपेईच्या चौऊ तीन चेनशी ख्ेाळताना कश्यपने १३-२१ व १२-२१ अशी अवघ्या ३३ मिनीटात सपशेल शरणागती पत्करली. अजय जयरामचा चीनच्या तियान हौवेईने १४-२१, २१-१९,१४-२१ असा पराभव केला. मात्र, पुरुष एकेरीत भारताचा उदयोन्मुख खेळाडू एच एस प्रणॉय याने चांगली झुंज देत फ्रांसच्या ब्राईस लेवरेजला १६-२१, २१-८ व २१-१८ असे पराभूत केले. प्रणॉयची दुसऱ्या फेरीत इंग्लंडच्या राजीव ओसेफशी लढत होईल.
पुरुष दुहेरीत मनु अत्री-बी सुमित रेड्डी यांनी सातव्या क्रमांकावरील चीनच्या चाय बाओ व हॉंग वी या जोडीचा पराभव केला. महिला दुहेरीत ज्वाला-अश्विनी जोडीने मलेशियाच्या अ‍ॅलेसिया अ‍ॅन्सेली व फि चो सुंग यांचा २१-१२, २०-२२, २१-१४ असा ५१ मिनीटांच्या लढतीत पराभव केला.