रिओ येथे पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सोनेरी कामगिरी करण्यासाठी सायना नेहवालने क्रीडा मानसोपचारज्ज्ञाद्वारे मार्गदर्शन घ्यावे, असे ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू व प्रशिक्षक प्रकाश पदुकोण यांनी सांगितले.
केवळ बॅडमिंटन नव्हे तर कोणत्याही खेळात ऑलिम्पिक पदक मिळविण्याकरिता मानसिक तंदुरुस्तीची कसोटी ठरते. अन्य आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धामध्ये विजेतेपद मिळविणे थोडेसे सोपे असते, मात्र ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक खेळाडू आपल्या क्षमतेइतकी शंभर टक्के कामगिरी करण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळेच सायना व पी. व्ही. सिंधू यांनी मानसिक तंदुरुस्तीकडे आता लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ऑलिम्पिकपूर्वी एक महिना अगोदर असा सराव करण्याऐवजी आतापासूनच त्यांनी क्रीडा मानसतज्ज्ञाची मदत घेतली पाहिजे. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन सामन्यांच्या कालावधीत शंभर टक्के मानसिक तंदुरुस्ती टिकविण्यास प्राधान्य दिले पाहिजे. शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच जो खेळाडू सर्वोत्तम मनोधैर्य दाखवू शकेल तोच विजेतेपद मिळवू शकतो. सद्य:स्थितीत सायना व सिंधू यांच्याकडे ऑलिम्पिक पदक मिळविण्याची क्षमता आहे, असेही पदुकोण यांनी सांगितले.