ऑल इंग्लंड स्पर्धेतील अंतिम फेरीत कॅरोलीना मारिन हिच्याकडून झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी सायना नेहवालला इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पध्रेत मिळणार आह़े  २४ मार्चपासून ही स्पर्धा सुरू होत असून त्यामध्ये या दोन्ही खेळाडू आमने सामने येण्याची शक्यता आहे.
या दोन्ही खेळाडूंमध्ये यंदा दोन स्पर्धाच्या अंतिम फेरीत गाठ पडली होती. त्यापैकी सय्यद मोदी चषक स्पर्धेत सायना विजयी झाली होती, तर ऑल इंग्लंडच्या अंतिम फेरीत कॅरोलीना हिने विजय मिळविला होता. येथील स्पर्धेत तिला उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविताना अडचण येणार नाही. तेथे चीन तैपेईच्या पाई युपो हिच्याशी गाठ पडण्याची शक्यता आहे, तर कॅरोलीना हिला सहाव्या मानांकित ओकुहारा नोझोमी या जपानच्या खेळाडूचे आव्हान मिळण्याची शक्यता आहे.
पुरुषांच्या एकेरीत भारताची मदार मुख्यत्वे किदम्बी श्रीकांत व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विजेता पारुपल्ली कश्यप यांच्यावर आहे.
*ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना हिला पहिल्या फेरीत पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळविणाऱ्या खेळाडूचे आव्हान असणार आहे. दुसऱ्या फेरीत तिची राष्ट्रीय विजेती जी.ऋत्विका शिवानी हिच्याशी गाठ पडेल. उपांत्य फेरीत तिला चीनची झिन लुई हिचा अडथळा पार करावा लागणार आहे.
*कॅरोलीना हिला पहिल्या सामन्यात भारताच्या रितुपर्णा दास हिचे आव्हान असेल. तिला विजेतेपदापूर्वी थायलंडच्या रात्चानोक इन्तानोन हिचाही अडथळा पार करावा लागेल़