पी.व्ही. सिंधू व किदम्बी श्रीकांतवर भारताची भिस्त
अव्वल दर्जाची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पदकांची भिस्त पी. व्ही. सिंधू व किदम्बी श्रीकांत यांच्यावर अवलंबून आहे.
सायनाला नुकत्याच झालेल्या चीन खुल्या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. या स्पर्धेतील अंतिम फेरीत तिने पायाला झालेल्या दुखापतीमुळे माघार घेतली होती. दुखापतीच्याच कारणास्तव तिने हाँगकाँगच्या स्पर्धेतूनही माघार घेतली आहे. सायनाने २०१०मध्ये या स्पध्रेत अजिंक्यपद मिळवले होते. तिच्या अनुपस्थितीत सिंधूच्या कामगिरीवर सर्वाचे लक्ष असले तरीही पहिल्याच फेरीत सिंधूपुढे विश्वविजेत्या कॅरोलीन मारिनचे आव्हान आहे. सिंधूने डेन्मार्क खुल्या स्पर्धेत ऑल इंग्लंड विजेत्या मरिनाला पराभवाचा धक्का दिला होता. सहाव्या मानांकित श्रीकांतने या स्पध्रेत गतवर्षी उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठली होती. त्याला पहिल्याच फेरीत जागतिक क्रमवारीतील दहावा मानांकित खेळाडू तियान हुओवेशी झुंजावे लागणार आहे. या दोन खेळाडूंमध्ये आतापर्यंत चार वेळा गाठ पडली असून प्रत्येक वेळी तियाननेच विजय मिळविला आहे. दोन वेळा डच खुली स्पर्धा जिंकणाऱ्या अजय जयरामला पहिल्याच फेरीत ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता खेळाडू चेन लाँगशी खेळावे लागणार आहे. गतवर्षी इंडोनेशियन मास्टर्स स्पर्धा जिंकणाऱ्या एच. एस. प्रणॉयला पहिल्या फेरीत पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळविलेल्या खेळाडूचे आव्हान असणार आहे.
महिलांच्या दुहेरीत २०१०च्या राष्ट्रकुल विजेत्या ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा यांना पहिल्या फेरीत दक्षिण कोरियाच्या जुंग कियांग युआन व शिन सेयुंग चान यांच्याशी खेळावे लागणार आहे.