गुवाहाटी : गुवाहाटी येथे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी सोमवारी भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला महिला एकेरीत अग्रमानांकन लाभले असून सायना नेहवालला दुसरे मानांकन देण्यात आले आहे.

पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांत व एच. एस. प्रणॉय यांनी तंदुरुस्तीच्या कारणास्तव स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सिंधू आणि सायना या दोघींवरच प्रामुख्याने चाहत्यांचे लक्ष असणार आहे. पुरुष एकेरीत समीर वर्मा, बी. साईप्रणित व पारुपल्ली कश्यप यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय मानांकन लाभले आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाला जेतेपद

मुंबई : आंतरराज्य विभागीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रतिभावान लक्ष्य सेन आणि मिश्र दुहेरीच्या श्लोक रामचंद्रन व श्रियांशी परदेशी या जोडीने चमकदार कामगिरी केल्यामुळे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने रेल्वेवर ३-२ असा विजय मिळवला. पुरुष एकेरीत लक्ष्यने शुभंकर डेवर २१-१७, २१-१७ अशी सरशी साधली. तर महिला एकेरीत आईच्या आकार्शी कश्यपने अनुरा प्रभुदेसाईवर २१-१८, १७-२१, २१-१८ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. मिश्र दुहेरीच्या लढतीत श्लोक-श्रियांशी याच्या जोडीने कनिका कन्वाल व अक्षय राऊत यांना २१-९, १७-२१, २१-८ असे पराभूत केले. रेल्वेसाठी रिया मुखर्जी व अनुरा प्रभुदेसाई यांनी महिला दुहेरीत, तर कबीर कझांरकर व हेमनगेंद्र बाबू यांनी पुरुष दुहेरीत विजय मिळवले.