ऑलिम्पिक पदक विजेत्या सायना नेहवालला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदकाने सातत्याने पाच वष्रे हुलकावणी दिली होती. मात्र यंदा कारकीर्दीतील पदकाची ही रिकामी जागी भरायच्या निर्धाराने खेळणाऱ्या सायनाने चीनच्या वांग यिहानवर मात करत पदक पक्के केले. दर्जेदार बॅडमिंटनची अनुभूती ठरलेला हा मुकाबला सायनाने २१-१५, १९-२१, २१-१९ असा जिंकला. विजयी फटक्यानंतर सायनाने केलेला जल्लोष हे पदक तिच्यासाठी किती महत्त्वाचे आहे, याची प्रचीती देणारा होता. शुक्रवारी झालेल्या अन्य लढतींमध्ये मात्र भारताच्या पदरी निराशाच पडली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदकांची हॅट्ट्रिक करण्याचे सिंधूचे स्वप्न भंगले तर ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पाला पराभवासह गाशा गुंडाळावा लागला.
दक्षिण कोरियाच्या आठव्या मानांकित स्युंग जि ह्य़ुनने सिंधूवर २१-१७, १९-२१, २१-१६ असा विजय मिळवला. २०१३ व २०१४मध्ये या स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या सिंधूला पदकांची हॅट्ट्रिक नोंदवण्याची सुवर्णसंधी होती. उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत ऑलिम्पिक पदकविजेत्या ली झेरुईला नमवत सिंधूने पदकाच्या आशा पल्लवित केल्या. मात्र झेरुईविरुद्धच्या लढतीतील सातत्य व कौशल्य सिंधूला ह्य़ुनविरुद्ध दाखवता आले नाही.
२०११ मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा २८ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपुष्टात आणणाऱ्या ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीला पराभवाला सामोरे जावे लागले. जपानच्या नाअको फुकूमान आणि कुरुमी योनाओ जोडीने ज्वाला-अश्विनी जोडीवर २५-२३, २१-१४ अशी मात केली.