ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल चीन खुल्या सुपर सीरिज प्रीमियर बॅडमिंटन स्पध्रेच्या जेतेपदापासून एका पावलाच्या अंतरावर आहे. सायना आणि युवा बॅडमिंटनपटू के. श्रीकांत यांनी सात लाख अमेरिकन डॉलर्स पारितोषिक रकमेच्या या स्पध्रेची अंतिम फेरी गाठण्याची किमया साधली आहे.
या प्रतिष्ठेच्या स्पध्रेत सहाव्यांदा सहभागी झालेल्या सायनाने महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत १७ व्या स्थानावर असलेल्या लिऊ शिनचा २१-१७, २१-१७ असा ४७ मिनिटांत पराभव केला. आता जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या सायनाची बे यिऑन जू (कोरिया) आणि अकेन यामागुची (जपान) यांच्या लढतीतील विजेत्याशी अंतिम फेरीत गाठ पडेल.
जागतिक क्रमवारीत १६ व्या स्थानावर असलेल्या श्रीकांतचा अंतिम फेरीत दोन वेळा ऑलिम्पिक आणि पाच वेळा विश्वविजेत्या लिन डॅनशी सामना होईल. उपांत्य फेरीत जर्मनीचा मार्क झ्वेबलरने दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडला, त्या वेळी श्रीकांत २१-११, १३-७ असा आघाडीवर होता.
महिलांच्या उपांत्य फेरीत प्रारंभी लिऊने ७-४ अशी आघाडी घेतली होती; परंतु सायनाने गुण मिळवण्याचा सपाटा लावताना ११-१० अशी आघाडी घेतली. त्यानंतर ही आघाडी १९-१३ पर्यंत वाढवली. मग लिऊने आणखी चार गुण मिळवल्यानंतर सायनाने पहिला गेम खिशात घातला.