उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताच्या आरएमव्ही गुरुसाईदत्तवर मात करीत समीर वर्माने हैदराबाद खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

तीन गेम रंगलेल्या या सामन्यात समीरने पहिला गेम १६-२१ असा गमावला, मात्र त्यानंतर जोरदार पुनरागमन करीत दुसरा गेम २१-१५ तर तिसरा गेम २१-११ असा जिंकून घेत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात मलेशियाच्या सूंग जो वेन याने इंडोनेशियाच्या फिरमान अब्दुल खोलिक याला २१-१७, २१-१४ असे सरळ दोन गेममध्ये पराभूत करीत अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे आता अंतिम सामन्यात भारताच्या समीरचा सामना सूंगशी होणार आहे. तर पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या सात्विकसाईराज रॅन्कीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने भारताच्याच अरुण जॉर्ज आणि सन्याम शुक्ला जोडीचा २१-१४, २१-६ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली आहे. मिश्र दुहेरीत भारताच्या प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी या जोडीने यांनी हॉँगकॉँगच्या चॅँग टाक चिंग – विंग युंग या जोडीवर मात करीत अंतिम फेरी गाठली आहे.