पीटीआय, नवी दिल्ली

भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा हिला मुलगा इझान आणि बहीण अनाम यांच्यासह ब्रिटनला जाण्यासाठी व्हिसा मंजूर झाला आहे. त्यामुळे विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत खेळण्याचा सानियाचा मार्ग सुकर झाला आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, क्रीडा मंत्रालय तसेच लंडन आणि संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय दूतावासाच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे. त्यामुळे सानियाला टोक्यो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी लंडनमधील काही स्पर्धामध्ये खेळण्याची संधी मिळेल. ‘‘करोनाची भीती सर्वत्र असल्याने परिस्थिती आणखीनच खडतर बनत चालली आहे. आता देशाचे प्रतिनिधित्व करताना मी १०० टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करेन. क्रीडामंत्री किरेन रिजिजू, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि ब्रिटन सरकारच्या सहकार्यामुळे मला ऑलिम्पिकसाठी सराव करण्याची संधी मिळेल,’’ असे सानियाने सांगितले.