भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनबद्दल दिलेल्या प्रतिक्रियेवरून समालोचक संजय मांजरेकर चर्चेचा विषय ठरले आहेत. मांजरेकरांनी अश्विनला सार्वकालिन महान खेळाडू म्हणण्यात विरोध केला होता. आता या विधानावर त्यांनी एक ट्वीट करून नवीन वादाला सुरुवात केली आहे. संजय मांजरेकर हे आपल्या वक्तव्यांमुळे परिचित आहेत. अनेक वेळा भारतीय खेळाडूंवर दिलेली त्यांची विधाने त्यांच्यावर खूप भारी पडतात.

संजय मांजरेकर म्हणाले, ‘‘ऑलटाइम ग्रेट’ ही एखाद्या क्रिकेटपटूला दिलेली सर्वोच्च प्रशंसा आहे. डॉन ब्रॅडमन, सोबर्स, गावसकर, तेंडुलकर, विराट इत्यादी क्रिकेटपटू माझ्या पुस्तकात महान आहेत. सन्मानपूर्वक, अश्विन अद्याप सार्वकालिन महान खेळांडूंमध्ये मोडत नाही.”

हेही वाचा – काय सांगता..! महेंद्रसिंह धोनीने स्कॉटलंडहून मागवला महागडा घोडा

अश्विन हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी फिरकीपटूंपैकी एक म्हणून ओळखला जातो. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाला आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नेण्यात अश्विनचा मोलाचा वाटा आहे. अश्विन हा आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे, परंतु अश्विनला आतापर्यंतचा महान खेळाडू घोषित केल्याबद्दल मांजरेकरांनी आपला आक्षेप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले होते मांजरेकर?

संजय मांजरेकर यांनी ईएसपीएनक्रिकइन्फोला सांगितले, “जेव्हा लोक अश्विनबद्दल आतापर्यंतचा महान खेळाडू म्हणून बोलू लागतात तेव्हा मला काही अडचणी येतात. अश्विनची समस्या अशी आहे की त्याने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया देशांमध्ये एकदाही पाच बळी घेतलेले नाहीत. भारतीय खेळपट्ट्यांवरील जबरदस्त कामगिरीकडे तुम्ही पाहिले असता, जडेजाने गेल्या चार वर्षात जवळजवळ अश्विनएवढे समान बळी मिळवले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या मालिकेमध्ये त्याच्यापेक्षा अधिक बळी अक्षर पटेलने घेतले होते.”

हेही वाचा – ‘‘हे करण्यापेक्षा समाजासाठी काहीतरी कर”, ट्रोल झाल्यानंतर सौरव गांगुलीनं ‘ती’ पोस्ट हटवली

अश्विनची कसोटी कामगिरी

अश्विनने कसोटीच्या एका डावात ५ बळी घेण्याची कामगिरी ३० वेळा केली आहे. भारतासाठी कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो चौथ्या स्थानी आहे. अश्विनने टीम इंडियाकडून ७८ कसोटी सामन्यांमध्ये ४०९ बळी घेतले आहेत.