आशियाई स्पर्धेतील अनुभवाच्या जोरावर आगामी जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत किमान कांस्यपदक मिळविण्याचा आत्मविश्वास अकोल्याची उदयोन्मुख खेळाडू संस्कृती वानखडे हिने ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला. ही स्पर्धा १९ ते ३० सप्टेंबर या कालावधीत दक्षिण आफ्रिकेत आयोजित केली जाणार आहे.
संस्कृती सध्या येथील कपील लोहाना या राष्ट्रीय खेळाडूच्या व्हिक्टोरियस बुद्धिबळ अकादमीत या स्पर्धेसाठी सराव करीत आहे. संस्कृतीने सलग चार वर्षे आशियाई स्पर्धेत आठ वर्षांखालील गटात अजिंक्यपद मिळविले आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून ती बुद्धिबळ खेळत आहे. शैक्षणिक वाटचालीस सुरुवात करण्यापूर्वी तिची बुद्धिमत्ता वाढावी या हेतूने तिचे वडील संघदास व आई भारती यांनी तिला बुद्धिबळ खेळण्याची संधी दिली. हळूहळू तिने या खेळात चांगले प्रावीण्य दाखविल्यानंतर त्यांनी तिला जितेंद्र अग्रवाल यांच्याकडे प्रशिक्षणासाठी पाठविले. अवघ्या दीड-दोन वर्षांच्या सरावानंतर तिने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धामध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
जागतिक स्पर्धेसाठी विशेष प्रशिक्षण घेण्यासाठी ती येथे कपील लोहाना याचे मार्गदर्शन घेत आहे. तेथे दररोज चार तास सराव करीत आहे. आगामी जागतिक स्पर्धेविषयी ती म्हणाली, आफ्रिकेतील स्पर्धेत माझ्यापुढे चीन, रशिया यांचे आव्हान असणार आहे. चीनच्या खेळाडूंविरुद्ध मी आशियाई स्पर्धेत विजय मिळविला आहे. त्यामुळे त्यांचे कोणतेही दडपण माझ्यावर नाही.
कोणती शैली अधिक आवडते या प्रश्नावर उत्तर देताना संस्कृती म्हणाली, कारोकान व सिसिलीयन तंत्र मला अधिक आवडते. सुरुवातीपासून आक्रमक डावपेच न करता हळूहळू डावावर नियंत्रण मिळविण्यावर माझा जास्त भर असतो. येथील सरावात मी डावाचे शेवटी कसे नियंत्रण राखायचे यावर भर देत आहे.
पाच वेळा विश्वविजेतेपद मिळविणारा विश्वनाथन आनंद हा तिच्यासाठी आदर्श खेळाडू आहे. सध्या ती कँडीडेट मास्टर असून आणखी तीन वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय महिला मास्टर व ग्रँडमास्टर किताब मिळविण्याचे तिचे ध्येय आहे.
संस्कृती हिच्याकडे जागतिक स्पर्धेत चमक दाखविण्याची क्षमता आहे. आशियाई स्पर्धेत तिने चीनच्या खेळाडूंवर मात केली आहे. त्याचा फायदा तिला जागतिक स्पर्धेत मिळेल असे सांगून कपील म्हणाला, डावात विविधता आणण्यासाठी बुद्धिबळाची वेगवेगळी कोडी सोडविण्यावर मी भर देत आहे. डावात शेवटपर्यंत कसे वर्चस्व राखता येईल यासाठी तिला विशेष मार्गदर्शन केले जात आहे.