दक्षिण आफ्रिकी खेळाडूवर वर्णद्वेषी टीका केल्याबद्दल पाकिस्तानी संघाचा कर्णधार सरफराज अहमदवर आयसीसीने ४ सामन्यांची बंदी घातली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यादरम्यान सरफराजने दक्षिण आफ्रिकेच्या अँडील फेलुक्वायोला उद्देशून वर्णद्वेषी आणि आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्याचं हे वक्तव्य सामना सुरु असताना स्टम्प जवळच्या माईकमध्ये रेकॉर्ड झालं.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरव झाल्यानंतर सरफराजवर टीकेची झोड उठली. यानंतर सरफराजनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आणि फेलुक्वायोची भेट घेत माफी मागितली होती. मात्र आयसीसीच्या नियमांनुसार सरफराजला आता ४ सामन्यांच्या बंदीच्या शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे. यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरच्या दोन वन-डे सामन्यात सरफराज खेळू शकणार नाहीये.