आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स संघटना महासंघाच्या अटीतटीच्या निवडणुकीत इंग्लंडच्या सेबॅस्टियन को यांची अध्यक्षपदी निवड झाली. को यांनी सर्जेय बुब्का यांच्यावर मात केली. बुब्का यांच्या ९२ मतांच्या तुलनेत को यांना ११५ मते मिळाली.
मावळते अध्यक्ष लॅमिन डिअ‍ॅक यांनी आपल्या भाषणात अ‍ॅथलेटिक्सविरोधी भूमिका घेणाऱ्या व्यक्तींवर जोरदार टीका केली. अशा प्रवृत्ती घातक असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘‘अ‍ॅथलेटिक्स खेळातील अनिष्ट  प्रवृत्तींच्या उच्चाटनासाठी प्रयत्न करणार असून, खेळाची प्रतिमा सुधारावी यासाठी कटिबद्ध असेन,’’ असे ५८ वर्षीय को यांनी सांगितले.
दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले बुब्का उपाध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत विजयी झाले. बुब्का यांच्यासह कतारचे दहलान अल हमाद, कॅमेरूनचे हमाद कलकाबा मलबौम आणि क्युबाचे अल्बटरे ज्युआनटोरेना उपाध्यक्ष म्हणून कार्यभार पाहणार आहेत.
अ‍ॅथलेटिक्स क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या कथित उत्तेजक सेवन प्रकरण को यांच्यासाठी अध्यक्ष म्हणून पहिले आव्हान असणार आहे. असंख्य अव्वल अ‍ॅथलिट उत्तेजकांच्या विळख्यात असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.
महासंघाच्या कार्यकारिणी सदस्यपदी सुमारीवाला
भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांची आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स संघटना महासंघाच्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. बीजिंग, चीन येथे झालेल्या महासंघाच्या ५०व्या बैठकीत कार्यकारिणी समितीसाठी निवडणुका झाल्या. कार्यकारिणी सदस्य म्हणून नऊ सदस्यांची निवड झाली. माजी अ‍ॅथलिट सुमारीवाला यापैकी एक असणार आहेत. सदस्यपदासाठीच्या निवडणुकीत सुमारीवाला यांना ६१ मते मिळाली. आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या कार्यकारिणीत नियुक्ती होणारे सुमारीवाला पहिले भारतीय आहेत.
भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष सुरेश कलमाडी २००१ ते २०१३ या कालावधीत आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या कार्यकारिणी सदस्यपदी होते. मात्र भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्ष या नात्याने त्यांना ही संधी मिळाली होती.