भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्याला प्रारंभ करण्यापूर्वी अ‍ॅडलेड येथे दोन आठवडे विलगीकरण करणे अनिवार्य असेल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉक्ले यांनी जाहीर केले.

दोन आठवडय़ांचा विलगीकरणाचा काळ निराशाजनक असल्याचे मत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते. परंतु हॉक्ले यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे अन्य पर्याय नसल्याचे सांगतिले. ३ डिसेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका रंगणार आहे.

‘‘ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला प्रारंभ करण्यापूर्वी दोन आठवडय़ांचे विलगीकरण भारतीय खेळाडूंसाठी बंधनकारक असेल. परंतु या कालावधीदरम्यान खेळाडूंसाठी पुरेशी सराव व्यवस्था करण्यात येईल. तसेच त्यांच्या आहाराचीही योग्य काळजी घेतली जाईल. खेळाडूंच्या आरोग्य सुरक्षेशी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून तडजोड केली जाणार नाही,’’ असे हॉक्ले म्हणाले.

‘आयसीसी’चा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मान्य

‘आयसीसी’चा ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मान्य केला आहे. ‘‘करोनाचा क्रीडा क्षेत्राला मोठय़ा प्रमाणावर फटका बसला आहे. त्यामुळे विश्वचषक लांबणीवर टाकणेच गरजेचे होते. १६ संघांतील खेळाडूंसह व्यवस्थापकांच्या आरोग्य सुरक्षेची जबाबदारी उचलणे फार जोखमीचे होते. त्यामुळे ‘आयसीसी’चा निर्णय योग्यच आहे,’’ असेही हॉक्ले म्हणाले.