पर्थ : सर्वकालीन महान टेनिसपटूंमध्ये गणना होणारे रॉजर फेडरर आणि सेरेना विल्यम्स यांचा एकमेकांविरुद्धचा सामना पाहण्याची संधी टेनिसशौकिनांना यंदा प्रथमच मिळणार आहे. होपमन चषकात स्वित्र्झलड विरुद्ध अमेरिका यांच्यात होणाऱ्या संमिश्र गटाच्या सामन्यात ही ‘एकमेवाद्वितीय’ लढत रंगणार आहे.
फेडरर आणि सेरेना या दोघांना विविध स्पर्धामध्ये एकाच वेळी पुरुष आणि महिला गटाच्या विजेतेपदाचा चषक उंचावताना प्रेक्षकांनी अनेकदा बघितले आहे. मात्र, या दोन महान टेनिसपटूंना एकमेकांविरुद्ध खेळताना पाहण्याचा योग अद्याप एकदाही मिळाला नव्हता. तो या लढतीच्या निमित्ताने जुळून येणार आहे.
दोघांच्या नावावर मिळून तब्बल ४३ ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदे असून हा सामना म्हणजे टेनिसप्रेमींसाठी एक अविस्मरणीय प्रसंग ठरणार आहे. होपमन चषकाचे अंतिम सामने पर्थला होणार असल्याने या महान खेळाडूंमधील सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत.
सेरेनाविरुद्धच्या त्या सामन्याबाबत सर्वच स्तरांवर उत्सुकता आहे. मी स्वत:ही त्या सामन्यात खेळण्यासाठी उत्सुक आहे. टेनिसशौकिनही त्या सामन्याची उत्कंठेने वाट पाहत आहेत.
– रॉजर फेडरर, टेनिसपटू
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 31, 2018 11:17 pm