सेरेना विल्यम्सने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची सलग १२व्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. २३ ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेनाने प्रभावी कामगिरी करत ग्रीसच्या मारिया सकारीला नमवले.

सेरेनाने १५व्या मानांकित सकारीविरुद्धच्या लढतीत दुसरा सेट गमावला होता. मात्र तरीदेखील सामन्यात यशस्वी पुनरागमन केले. सेरेनाने ही लढत ६-३, ६-७, ६-३ अशी जिंकली.  ‘‘प्रेक्षकांशिवाय खेळत असले तरी एक व्यावसायिक खेळाडू म्हणून सर्वोत्तम कामगिरी मला करता आली पाहिजे. तेच मी केले. वर्षांचे ३६५ दिवस सर्वोत्तम खेळ करण्याचाच माझा प्रयत्न असतो,’’ असे विश्वविक्रमी २४ ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी असलेल्या सेरेनाने म्हटले.

सेरेनाला सकारीकडून नुकतीच म्हणजेच २५ ऑगस्टला वेस्टर्न आणि सदर्न चषक टेनिस स्पर्धेत हार स्वीकारावी लागली होती. सेरेना पुढील तीन आठवडय़ांत ३९व्या वर्षांत पदार्पण करणार आहे. तिची उपांत्यपूर्व फेरीत बिगरमानांकित स्वेताना पिरोन्कोवाशी लढत होणार आहे.

३२ वर्षीय पिरोन्कोवाने तीन वर्षांनंतर टेनिसमध्ये पुनरागमन करूनही दमदार कामगिरीसह उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिने चौथ्या फेरीत अ‍ॅलिझ कॉर्नेटला ६-४, ७-६, ६-३ असे नमवले. दुसरी मानांकित सोफिया केनिनला मात्र पराभवाचा धक्का बसला. तिच्यावर १६व्या मानांकित एलिस मर्टेन्सने ६-३, ६-३ अशी मात केली. मर्टेन्सने सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. मर्टेन्सची उपांत्यपूर्व फेरीत बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाशी लढत होणार आहे. अझारेंकाने २०व्या मानांकित कॅरोलिना मुशोवाला ५-७, ६-१, ६-४ असे पराभूत केले.

पुरुष एकेरीत ऑस्ट्रियाच्या दुसऱ्या मानांकित डॉमिनिक थिमने उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याने १५वा मानांकित फेलिक्स ऑगर-अ‍ॅलिसिमला ७-६, ६-१, ६-१ असे तीन सेटमध्ये पराभूत केले. जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या थिमची उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक्स डी मिनॉरशी लढत होत आहे. अन्य उपांत्यपूर्व लढत आंद्रे रुब्लेव आणि डॅनिल मेडवेडेव यांच्यात होईल.

बोपण्णा उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

भारताचे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील आव्हान सोमवारी संपुष्टात आले. भारताच्या रोहन बोपण्णाला पुरुष दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला. कॅनडाच्या डेनिस शापोवालोवसोबत खेळताना बोपण्णाला हॉलंडचा जीन-ज्युलियन रॉजर आणि रोमानियाचा होरिया टेकायू यांच्याकडून ५-७, ५-७ असा पराभव स्वीकारावा लागला.

बार्टीची फ्रेंच खुल्या स्पर्धेतूनही माघार

ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅश्ले बार्टीने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतून करोनाचा धोका वाढत असल्याने माघार घेतली आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतूनही बार्टीने माघार घेतली होती. ‘‘करोनाच्या काळात प्रवास करणे सुरक्षित वाटत नाही. फ्रेंच स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेणे माझ्यासाठी सोपे नव्हते,’’ असे बार्टीने स्पष्ट केले.