पोर्तुगालचा नामांकित आक्रमणपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने झळकावलेल्या दोन गोलच्या बळावर युव्हेंटसने सेरी ए फुटबॉल स्पर्धेत रविवारी रात्री झालेल्या सामन्यात उडीन्स संघाला ३-१ असे पराभूत केले.

रोनाल्डोने अनुक्रमे ९व्या आणि ३७व्या मिनिटाला गोल केले. लिओनाडरे बोनुसीने ४५व्या मिनिटाला एक गोल करून युव्हेंटससाठी तिसरा गोल नोंदवला. पराभूत संघातर्फे इग्नाशिओ पुसेट्टोने (९०+४) एकमेव गोल केला. या विजयामुळे युव्हेंटसने गुणतालिकेत इंटर मिलानच्या साथीने (१६ सामन्यांत ३९ गुण) संयुक्तपणे अग्रस्थान मिळवले आहे. बुधवारी त्यांचा सॅम्पडोरियाविरुद्ध सामना रंगेल.

११ रोनाल्डोने युव्हेंटससाठी यंदाच्या हंगामातील १९ सामन्यांत सर्वाधिक ११ गोल केले आहेत.