भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज शफाली वर्मा आयसीसीच्या ताज्या महिला टी-20 क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानी आली आहे. दक्षिण आफ्रिकेबरोबर सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेमध्ये तिने पहिल्या दोन सामन्यात 23 आणि 47 धावा केल्या. शफालीने ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीला बाजुला हटवत प्रथम स्थान गाठले आहे.

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला टी-20 विश्वचषकात चमकदार कामगिरी करत 17 वर्षीय शफाने टी-20 क्रमवारीत पहिले स्थान मिळवले होते. गोलंदाजीत फिरकीपटू दीप्ती शर्मा 40व्या स्थानावर पोहोचली आहे. तर रिचा घोष 59 स्थानांची झेप घेत 85व्या स्थानी आली आहे.

गोलंदाजांच्या यादीत अष्टपैलू हर्लीन देओलने 262 स्थानांची झेप घेत फलंदाजांच्या यादीत 99 व्या स्थानी तर, गोलंदाजांच्या यादीत 146व्या स्थानी पोहोचली आहे. भारताची डावखुरी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाड 25व्या स्थानी पोहोचली आहे.

पहिल्या दोन सामन्यात भारताचा पराभव

स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताला आफ्रिकेने पहिल्या सामन्यात आठ, तर दुसऱ्या सामन्यात सहा गडी राखून धूळ चारली.  सलामीवीर शफाली वर्मा, हरलीन देओल यांनी भारतासाठी आतापर्यंत उत्तम योगदान दिले आहे. परंतु स्मृती, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष यांना फलंदाजीत सुधारणेची आवश्यकता आहे. गोलंदाजीत पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड आणि दीप्ती शर्मा अपयशी ठरत आहे.

आज मंगळवारी होणाऱ्या या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत खेळणारा भारतीय संघ सलग तिसरा पराभव टाळून शेवट गोड करण्यासाठी सज्ज झाला आहे.