शाहिद आफ्रिदीचे नाव असलेली पाकिस्तानी जर्सी घातल्याने आसाममधील युवकाला अटक केल्याच्याप्रकरणावर आफ्रिदीने नाराजी व्यक्त केली आहे. आसाममधील एका क्रिकेट सामन्यादरम्यान रिपन चौधरीने शाहिद अफ्रिदीच्या नावाची जर्सी घातल्यामुळे त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आणि पोलिसांनी त्याला अटक देखील केली. पाकिस्तानातील ‘जंग’ या वृत्तपत्रातील माहितीनुसार आसाम पोलिसांच्या या कृतीवर शाहिद आफ्रिदीने नाराजी व्यक्त करत याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना याविषयी विनंती करणार असल्याचे म्हटले आहे. क्रिकेटमध्ये राजकारण केले जात आहे. एखाद्या चाहत्याला अटक करणे ही निंदनीय घटना आहे, असेही आफ्रिदीने म्हटले आहे.

वाचा: पाकिस्तानची जर्सी घातल्यामुळे आसाममधील युवकाला तुरुंगवास

हैलालकंदी येथे जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये रिपन चौधरीने शाहिद अफ्रिदीच्या नावाची जर्सी घातल्यामुळे त्याच्यावर तुरुंगात जाण्याचा प्रसंग ओढावला. भारतीय असूनदेखील तो पाकिस्तानची जर्सी कशी काय घालू शकतो असे म्हणत भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. ही घटना साधी नसून यामागे त्याची पाकिस्तान धार्जिणी वृत्ती दिसते असे त्या कार्यकर्त्याने म्हटले.
आसाममध्ये झालेल्या असहिष्णुतेची निंदा करावी तेवढी कमी आहे. जर भारतामध्ये पाकिस्तानी खेळाडुंचे चाहते असू शकतात, तर पाकिस्तानातही भारतीय खेळाडुंचे चाहते आहेत, असे आफ्रिदीने म्हटले आहे.