शेन वॉटसनच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात विजयासह मालिकेवर कब्जा केला. पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ फरकाने जिंकली. मालिकेतील दोन सामने पावसामुळे रद्द झाले होते.
पाचव्या लढतीत शेन वॉटसनच्या १४३ धावांच्या मॅरेथॉन खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २९८ धावांचा डोंगर उभारला. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. मात्र त्यानंतर वॉटसन आणि कर्णधार क्लार्क यांनी चौथ्या विकेटसाठी १६३ धावांची भागीदारी करत डाव सावरला. ७५ धावांवर क्लार्कला जॉर्डनने बाद केले. क्लार्क  बाद झाल्यावर वॉटसनने सामन्याची सूत्रे हाती घेतली. मात्र दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळू शकली नाही. वॉटसनने १०७ चेंडूंतच १२ चौकार आणि ६ षटकारांसह १४३ धावांची तडाखेबंद खेळी साकारली. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला २९८ धावांत रोखले. बेन स्टोक्सने ६१ धावांत ५ बळी टिपले. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडचा डाव २४९ धावांत आटोपला. रवी बोपाराने सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियातर्फे जेम्स फॉल्कनरने सर्वाधिक ३ बळी घेतले. शतकवीर वॉटसनला सामनावीर तर मायकेल क्लार्कला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.