Nidahas Trophy 2018 निधास चषकातील दुसऱ्या भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये रंगलेल्या टी २० सामन्याचा सामनावीर ठरला तो शार्दुल ठाकूर. नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय सार्थही ठरवला. शार्दुल ठाकूरने चार षटकांमध्ये २७ धावांच्या बदल्यात श्रीलंकेचे ४ गडी तंबूत पाठवले. त्याच्या या खेळीमुळे श्रीलंकेच्या फलंदाजांवर नियंत्रण मिळवणे टीम इंडियाला सोपे गेले आणि १५२ धावांवर श्रीलंकेला रोखण्यात टीम इंडियाला यश मिळाले.

भारताने ६ गडी राखून श्रीलंकेवर मात केली. या सामन्यात सामनावीर ठरला तो भारतीय गोलंदाज शार्दुल ठाकूर. महत्वाची गोष्ट म्हणजे टी-२० सामन्यात अखेरच्या षटकात फलंदाज फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करत असतानाही शार्दुलने लंकेच्या फलंदाजांना चांगलचं जखडून ठेवलं. भारतीय गोलंदाजांच्या या सुरेख कामगिरीमुळे श्रीलंकेचा संघ १९ षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्यात १५२ धावांपर्यंत मजल मारु शकला. हे आव्हान गाठताना सुरुवातीला भारतीय फलंदाजी ढेपाळली होती. पण त्यानंतर मनिष पांडे आणि दिनेश कार्तिक यांनी भारताचा डाव सावरला आणि विजय खेचून आणला.

भारतीय फलंदाजीत अत्यंत निर्णायक ठरली ती मनिष पांडेची खेळी. ३१ चेंडूत १ षटकार आणि ३ चौकारांसह ४२ धावांची खेळी करणारा मनिष पांडेही या सामन्याचा हिरो ठरला असेच म्हणता येईल. रोहित शर्मा, शिखर धवन आणि लोकेश राहुल तंबूत परतले तेव्हा मनिष पांडेने डाव सावरला. दिनेश कार्तिक आणि मनिष पांडे या दोघांनी केलेल्या धावांच्या भागिदारीमुळे भारताचा विजय सोपा झाला.