गोलंदाजीच्या शैलीमुळे ‘आयसीसीने’ घातली बंदी
वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज शेन शिलिंगफोर्ड याच्यावर आंतराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने (आयसीसी) बंदी घातली आहे. शिलिंगफोर्डची गोलंदाजी शैली संशयास्पद असल्याचे आढळून आल्यानंतर आयसीसीने चौकशी करून ही कारवाई केली आहे.
गेल्या महिन्यात भारताविरुद्ध झालेल्या दुसऱया म्हणजेच सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या कसोटी सामन्यात शिलिंगफोर्ड आणि सॅम्युअल्सची गोलंदाजी शैली संशयास्पद असल्याचे आढळून आले होते. यानंतर सामन्याच्या पंचांनी यासंबंधीचा अहवाल आयसीसीकडे सोपविला. यामध्ये सॅम्युअल्सचा जलद चेंडू आणि शिलिंगफोर्डच्या दुसरा स्पिन बद्दल पंचांनी शंका उपस्थित केली होती. यावर आयसीसीने शिलिंगफोर्ड जोपर्यंत आपल्या गोलंदाजी शैलीत बदल करत नाही तोपर्यंत त्याच्यावर बंदी घालणार असल्याचा निर्णय आयसीसीने दिला. तसेच सॅम्युअल्सची ऑफ ब्रेक गोलंदाजी जरी योग्य असली तरी जलद चेंडु टाकण्याची त्याची शैली योग्य नाही असेही आयसीसीने स्पष्ट केले आहे.
सचिन तेंडुलकर आपल्या आंतराष्ट्रीय कारकिर्दीतील १९९ कसोटी कोलकाता येथे खेळत असताना याच शेन शिलिंगफोर्डने सचिनला बाद केले होते. त्यानिर्णयावरूनही वादळ उठले होते. आता याच शिलिंगफोर्डच्या गोलंदाजी शैलीवर संशय उपस्थित करत आयसीसीने त्याला ‘बाद’ केले आहे.