News Flash

शाळा-महाविद्यालयांत वर्षांतून एकदाच क्रीडादिवस का?

उदय देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

गेट वे ऑफ इंडिया येथे रविवारी जवळपास ८८ खेळाडू, प्रशिक्षक आणि संघटकांना राज्यपाल सी. विद्यसागर राव आणि क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले.

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यपाल विद्यासागर राव यांचा सवाल; उदय देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वर्षांतून एकच दिवस वार्षिक क्रीडा दिन साजरा केला जातो; पण भारताला क्रीडा क्षेत्रातही सक्षम राष्ट्र बनवायचे असेल तर फक्त एक दिवस क्रीडा दिन साजरा करून चालणार नाही. क्रीडा आणि खेळ हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक असायला हवा, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या वितरण सोहळ्यात केले.

गेट वे ऑफ इंडिया येथे रविवारी जवळपास ८८ खेळाडू, प्रशिक्षक आणि संघटकांना २०१७-१८ वर्षांसाठीचे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन राज्यपाल तसेच क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. मल्लखांब या खेळाचा जगभर प्रसार करणारे मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर ग्रँडमास्टर स्वप्निल धोपाडे, महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना, कबड्डीपटू सायली केरीपाळे, टेनिसपटू ऋतुजा भोसले, धावपटू मोनिका आथरे, कुस्तीपटू उत्कर्ष काळे, बॅडमिंटनपटू नेहा पंडित यांच्यासह अनेक अव्वल खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने गौरवण्यात आले.

राज्यपाल म्हणाले की, ‘‘भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी दोन महिन्यांपूर्वी माझी भेट घेऊन राज्यात ‘तंदुरुस्त भारत’ आणि ‘सांघिक युवा’ हे दोन उपक्रम राबविण्याचा सल्ला दिला. प्रत्येक मुलाने, विद्यार्थ्यांने तसेच प्रत्येक युवकाने दररोज किमान एक तास तरी खेळण्याचा सराव करावा, असेही सचिन यांनी सुचवले. एका भारतरत्न पुरस्कारविजेत्या खेळाडूने दिलेल्या सल्लय़ाशी मी पूर्णपणे सहमत असून विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात दररोज एक तास घालवण्यास मी प्रोत्साहित करण्यासाठी पालक आणि शिक्षकांना आवाहन करीत आहे.’’

‘‘आजची पिढी ही सध्या मोबाइल आणि गॅझेटवर जास्त वेळ घालवत आहेत. अनेक जण गेम खेळत आपला मौल्यवान वेळ वाया घालवत आहेत. लहान मुलांमधील शारीरिक हालचाल कमी होऊन त्यांच्यात लठ्ठपणासारख्या समस्या उद्भवत आहेत, ही खरोखरच चिंताजनक बाब आहे. स्वस्थ भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी खेळाला पुनरुज्जीवन देणे गरजेचे आहे. त्यासाठी आगामी काळात खेळाडूंना प्रशिक्षित करण्यासाठी माजी खेळाडूंच्या अनुभवाचा, क्षमतेचा वापर करणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व क्रीडा प्रशिक्षक विविध क्रीडा प्रकारांमध्ये अव्वल दर्जाचे क्रीडापटू तयार करण्यास मदत करतील,’’ अशी आशा राज्यपालांनी व्यक्त केली.

‘‘नुकत्याच पुण्यात झालेल्या ‘खेलो इंडिया’ क्रीडा महोत्सवात महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. ८५ सुवर्ण, ६२ रौप्य आणि ८१ कांस्यपदकांसह महाराष्ट्राने सांघिक जेतेपदाची कमाई केली. भविष्यातही महाराष्ट्राचे खेळाडू अशाच प्रकारे आपले नेतृत्व सिद्ध करतील, अशी आशा आहे. क्रीडा क्षेत्रातही राज्याने अग्रस्थानी यावे, यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये पायाभूत सोयीसुविधा विकसित करणे तसेच आहेत त्या सुविधा सुधारणे आवश्यक आहे. तसेच पदकांची अपेक्षा असलेल्या क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी खासगी क्रीडा संस्थांना बळकटी देणे आवश्यक आहे,’’ असेही त्यांनी सांगितले.

पुरस्कारामुळे प्रोत्साहन मिळते- स्मृती मानधना

कोणत्याही पुरस्कारामुळे खेळाडूला हे प्रोत्साहन मिळत असते. त्यामुळे राज्यासह देशासाठी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा आम्हाला मिळते. स्वत:च्या राज्याने शिवछत्रपती पुरस्कार देऊन माझा सन्मान केला आहे, ही गौरवास्पद बाब आहे. देशासाठी चांगली कामगिरी केल्यामुळे हा पुरस्कार मिळाल्यानंतर समाधान वाटते, असे मत महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाने व्यक्त केले.

दोन खेळाडूंकडून शहीदांसाठी पुरस्काराची रक्कम

काही दिवसांपूर्वी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्लय़ात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंनी आपल्या पुरस्काराची रक्कम सुपूर्द केली. पुण्याची बुद्धिबळपटू सलोनी सापळे आणि मुंबईचा स्क्वॉशपटू महेश माणगांवकर यांनी शहीदांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपयाची रक्कम सुपूर्द केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 12:12 am

Web Title: shiv chhatrapati sports award 2019
Next Stories
1 ऑलिम्पिक पदकाच्या दृष्टीनेच सराव सुरू!
2 पुलवामा हल्ल्याच्या निषेधासाठी मला सोशल मीडियाची गरज नाही, ट्रोलर्सना सानिया मिर्झाने सुनावलं
3 Pulwama Terror Attck : पाकिस्तान सुपर लिगचं प्रक्षेपण करणार नाही, D-Sports वाहिनीची भूमिका