दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातला दुसरा वनडे सामना सध्या चर्चेत आहे. पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमानचं द्विशतक या सामन्यात अवघ्या सात धावांनी हुकलं आणि तो धावबाद झाला. पण तो ज्याप्रकारे धावबाद झाला त्यावरुन बरीच चर्चा सुरू असून आता पाकिस्तानचा माजी दिग्गज क्रिकेटपटू शोएब अख्तरनेही प्रतिक्रिया दिली आहे. शोएबने स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करताना क्विंटन डी कॉक आणि मॅच रेफ्रींवर जोरदार टीका केली आहे.

झालं काय?

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत ३४१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात फखरच्या शानदार खेळीनंतरही पाकला विजय मिळवता आला नाही. त्यांनी ९ बाद ३२४ धावा केल्या. फखरला द्विशतक झळकावता आले नाही पण धावांचा पाठलाग करताना वनडेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला. फखरने १५५ चेंडूत १८ चौकार आणि १० षटकारांसह १९३ धावा केल्या. द्विशतकाजवळ असताना त्याने अखेरच्या षटकात लुंगी एंगिडीच्या पहिल्याच चेंडूवर फटका मारला आणि पहिली धाव पूर्ण केली. दुसरी धावही त्याने जवळपास पूर्ण केली होती. पण, तो एडम मार्करमच्या शानदार फेकीवर धावबाद झाला. जमानला धावबाद करण्यात एडमच्या डायरेक्ट थ्रो चं जितकं योगदान होतं त्यापेक्षा जास्त विकेटकिपर क्विंटन डी कॉकच्या चालाखीचंही होतं. फखर दुसरी धाव घेत असताना डी कॉकने फिल्डर एडमला नॉन स्ट्रायकरच्या दिशेला थ्रो कराण्याचा इशारा केला, ते बघून फखरने धावण्याचा वेग कमी केला आणि तो मागे नॉन-स्ट्राइकरच्या दिशेला धावणाऱ्या हरिस रऊफकडे बघायला लागला. पण क्षेत्ररक्षकाने फखर जमानच्या दिशेनेच चेंडू फेकला आणि तिथेच फखरची फसगत झाली व तो धावबाद झाला. त्यानंतर डि कॉकने खोटे हावभाव करुन फसवलं त्यामुळे आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन असल्याची टीका क्रिकेटप्रेमींकडून होत आहे.

काय म्हणाला अख्तर? :-

शोएब अख्तरने आपल्या यु-ट्यूब चॅनलवर, क्विंटन डी कॉकने जे केलं त्याला मी चिटिंग म्हणणार नाही. पण ती कृती खेळभावनेच्या विरोधात होती असं म्हटलं. डी कॉकच्या कृतीमुळे खेळभावनेला तडा गेली आहे. तो एक उत्तम खेळाडू असून त्याने जाणूनबुजून असं करायला नको होतं. कारण थ्रो नॉन-स्ट्राइकरकडे जाईल असा विचार फखरने केला होता आणि डी कॉकनेही तसाच इशारा केला होता… फखर जमानच्या २०० धावा पूर्ण न झाल्याचं वाइट वाटतंय. असं अख्तर म्हणाला. “मला वाइट वाटतंय कारण फखर जमानचं द्विशतक पूर्ण व्हावं आणि एक मोठा विक्रम त्याच्या नावावर व्हावा अशी इच्छा होती. जर पेनल्टी धावा दिल्या असत्या तर पाकिस्तानचा संघ सहज सामना जिंकला असता. पण मॅच रेफ्रींनी सर्व प्रकारे रिप्ले बघूनही निर्णय घेतला नाही.  जर मॅच रेफ्रींना रिप्लेमध्ये सर्व प्रकार बघायला मिळाला तरी त्यांनी यावर काहीच निर्णय का घेतला नाही. तुम्ही नो बॉल किंवा चेंडू बॅटला लागलाय की नाही हे बघण्यासाठी रेफरल घेतात, मग इथे क्रिकेटचा नियम लागू करण्यामध्ये काय समस्या होती हाच माझा प्रश्न आहे”, असं शोएब म्हणाला.

नियम काय ?

आयसीसीच्या नियम ४१.५ मध्ये फेक फिल्डिगचा उल्लेख केला आहे. या नियमानुसार कोणत्याही फिल्डरने जाणिवपूर्वीक, शब्द अथवा कृतीने चेंडू खेळल्यानंतर कोणत्याही फलंदाजाचे लक्ष विचलीत केले, भ्रमित केले, अडथळा निर्माण केला तर ती कृती फेक फिल्डिंग समजली जाईल. नियम ४१.५.२ नुसार मैदानावरील ही कृती फेक फिल्डिंग आहे की नाही ठरवण्याची जबाबदारी दोन्ही अंपायर्सची असते. तो चेंडू डेड बॉल ठरवून फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावा देण्याचा अधिकार अंपायरकडे असतो.


दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत ३४१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात फखरच्या शानदार खेळीनंतरही पाकला विजय मिळवता आला नाही. त्यांनी ९ बाद ३२४ धावा केल्या.