आंतरराष्ट्रीय दर्जाचे चाचणी साहित्य नसल्याचे कारण देत जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेकडून (वाडा) राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेवरील (एनडीटीएल) निलंबनात सहा महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. ‘वाडा’च्या या निर्णयामुळे टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा एका वर्षांवर असताना भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेला धक्का बसला आहे.

‘वाडा’कडून गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ‘एनडीटीएल’वर सहा महिन्यांचे निलंबन घालण्यात आले होते. पुन्हा एकदा फेब्रुवारीमध्ये ‘वाडा’कडून करण्यात आलेल्या तपासात आंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे आवश्यक चाचण्यांचे साहित्य उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात आले आहे. ‘‘नवी दिल्ली येथील राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेची मान्यता दुसऱ्या वेळेस सहा महिन्यांसाठी रद्द करत आहोत. या निलंबनामुळे उत्तेजकविरोधी प्रकरणातील चाचण्या करता येणार नाहीत,’’ असे ‘वाडा’ने स्पष्ट केले आहे. जानेवारी २०२१ पर्यंत हे निलंबन असणार आहे.

सध्याच्या स्थितीत मूत्र चाचणीचे नमुने राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेकडून (नाडा) घेण्यात येतात. ते नमुने दोहा येथील ‘वाडा’ने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येतात. मात्र सूचनांप्रमाणे प्रयोगशाळेत सुधारणा करण्यात आल्या तर निलंबन उठवण्यासंबंधीची दाद मागता येईल, असेही ‘वाडा’कडून स्पष्ट करण्यात आले. सहा महिन्यांच्या निलंबनामुळे ‘एनडीटीएल’ला जुलै २०२१ म्हणजेच भारताच्या खेळाडूंची कोणतीही चाचणी करता येणार नाही.

परदेशात नमुने पाठवणे महागडे

दोहा येथे भारताच्या खेळाडूंचे नमुने पाठवणे हे आर्थिकदृष्टय़ा महागडे ठरत आहे. त्यातच दोहा येथे चाचणीचे नमुने पाठवल्याने त्याचे निकालही उशिरा मिळतात त्यामुळे संबंधित दोषी खेळाडूबाबतचा निर्णय घेणेही कठीण जात आहे.

करोनाची साथ टिकल्यास ऑलिम्पिक कठीण!

टोक्यो : करोना संसर्गाची जगभरातील स्थिती कायम राहिली तर पुढील वर्षीदेखील टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन कठीण आहे, असे ऑलिम्पिक संयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांनी बुधवारी स्पष्ट केले.

‘‘करोना संसर्गाचा सध्याच्या स्थितीत असणारा धोका कायम राहिला तर ऑलिम्पिकचे आयोजन पुढील वर्षीदेखील कठीण आहे,’’ असे मोरी यांनी म्हटले. पुढील वर्षी २३ जुलै २०२१ पासून टोक्यो ऑलिम्पिकचे वेळापत्रक आहे. त्यासाठी बरोबर एक वर्ष बाकी म्हणून १५ मिनिटांचा कार्यक्रम प्रेक्षकांशिवाय नॅशनल स्टेडियमवर गुरुवारी आयोजित करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) आणि जपानचे आयोजक यांनी सातत्याने ऑलिम्पिक पुढील वर्षी निश्चितपणे आयोजित होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.