कर्णधार शुभमन गिल (१४३) आणि मयांक अगरवाल (१२०) या दोन्ही सलामीवीरांनी साकारलेल्या शतकांना फिरकीपटू जलाज सक्सेनाच्या (७/४१) अप्रतिम गोलंदाजीची साथ लाभल्यामुळे भारत ‘क’ संघाने शुक्रवारी देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत ‘अ’ संघाचा तब्बल २३२ धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह भारत ‘क’ संघाने अंतिम फेरी गाठली, तर सलग दोन पराभवांमुळे भारत ‘अ’ संघाचे आव्हान संपुष्टात आले. आता सोमवारी भारत ‘क’ विरुद्ध भारत ‘ब’ यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे.

Video : शॉट खेळला पण क्रीजमध्ये यायलाच विसरला… पहा विचित्र ‘रन आऊट’

भारत ‘क’ संघाकडून शुभमन गिलने दमदार शतक ठोकले. त्याने १४२ चेंडूत १४३ धावा केल्या. या खेळीत १० चौकार आणि ६ षटकार लगावले. याउलट भारत ‘अ’ च्या संपूर्ण संघाने मात्र १३४ धावा केल्या. त्यात एकूण ८ चौकार आणि ४ षटकार लगावले. एका खेळाडूची वैयक्तिक धावसंख्या प्रतिस्पर्धी संघाच्या पूर्ण धावसंख्येपेक्षा जास्त धावा असण्याची ही देवधर करंडक स्पर्धेतील पहिली वेळ होती. शुभमन गिलने हा कोणालाही न जमलेला पराक्रम केला.

दरम्यान, रांचीला झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना शुभमन आणि मयांक यांच्या २२६ धावांच्या सलामीमुळे भारत ‘क’ संघाने ५० षटकांत ३ बाद ३६६ धावांचा डोंगर उभारला. मुंबईकर सूर्यकुमार यादवनेसुद्धा अवघ्या २९ चेंडूंत नऊ चौकार आणि चार षटकारांसह ७२ धावा फटकावून संघासाठी बहुमूल्य योगदान दिले.

प्रत्युत्तरात जलाजच्या फिरकीपुढे भारत ‘अ’ संघाच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. त्याने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजीचे पृथ:करण नोंदवताना भारत ‘अ’ संघाचा डाव अवघ्या १३४ धावांत गुंडाळला. देवदूत पड्डिकल (३१) आणि भार्गव मेराई (३०) यांच्याव्यतिरिक्त कोणीही भारत ‘अ’ संघातर्फे झुंज देऊ शकले नाही.

संक्षिप्त धावफलक

भारत ‘क’ : ५० षटकांत ३ बाद ३६६ (शुभमन गिल १४३, मयांक अगरवाल १२०; हनुमा विहारी १/४८) विजयी वि. भारत ‘अ’ : २९.५ षटकांत सर्व बाद १३४ (देवदूत पड्डिकल ३१, भार्गव मेराई ३०; जलाज सक्सेना ७/४१)