शुभमन गिलच्या द्विशतकासह (नाबाद २०४) प्रियांक पांचाळ (११५) आणि हनुमा विहारी (१००) यांच्या शतकांच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्धची चारदिवसीय पहिली कसोटी अनिर्णित राखली. मात्र गिलच्या द्विशतकामुळे आता त्याला भारताकडून न्यूझीलंडमध्ये कसोटी पदार्पण करायला मिळते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. कारण भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी संघनिवड लवकरच होणार आहे.

यास्थितीत गिलने दावेदारी भक्कम केली आहे. याआधी दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या कसोटी मालिकेतही गिलचा कसोटी संघात समावेश होता, मात्र त्याला पदार्पणाची संधी मिळाली नव्हती.

गिलने गेल्या वर्षी वेस्ट इंडिज दौऱ्यातही ‘अ’ संघाकडून द्विशतक झळकवले होते.

न्यूझीलंड ‘अ’ विरुद्धच्या दुसऱ्या डावात गिलच्या खेळीत २२ चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. गिलने हनुमा विहारीसह चौथ्या गडय़ासाठी नाबाद २२२ धावांची भागीदारी केली. ते पाहता खेळ संपेपर्यंत भारत ‘अ’ संघाला ३ बाद ४४८ धावा करता आल्या. पहिल्या डावात भारत २१६ धावाच करू शकला होता. गिलचे त्या डावात सर्वाधिक ८३ धावांचे योगदान होते. त्याबदल्यात न्यूझीलंड ‘अ’ संघाने ५६२ धावा केल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक

भारत ‘अ’ (पहिला डाव) : २१६

न्यूझीलंड ‘अ’ (पहिला डाव) : ७ बाद ५६२

भारत ‘अ’ (दुसरा डाव) : ३ बाद ४४८ (शुभमन गिल नाबाद २०४, प्रियांक पांचाळ ११५, हनुमा विहारी १००).