मुंबई : तौक्ते वादळामुळे जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यांनी सोमवारी मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमचे नुकसान केले आहे. याशिवाय वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील शरद पवार जिमखान्यालाही त्याचा फटका बसल्याची माहिती मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) दिली.

सोमवारी गुजरात आणि राजस्थान राज्यात प्रामुख्याने घोंघावणाऱ्या तौक्ते वादळाचे पडसाद महाराष्ट्रावरही उमटले. मुंबईत अनेक ठिकाणी झाडे आणि घरांची हानी झाली. ‘‘वाऱ्याच्या जोरदार प्रवाहामुळे वानखेडे स्टेडियममधील नॉर्थ स्टँडच्या दिशेने असलेली १६ फू ट उंचीची साइटस्क्रीन खाली कोसळली. यापूर्वी २०११च्या विश्वचषकादरम्यानही अशी घटना घडली होती. मात्र सध्याच्या दुर्घटनेत कोणलाही इजा झालेली नसून लवकरच साइटस्क्रीन पुन्हा तयार करण्यात येईल,’’ असे ‘एमसीए’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले. त्याशिवाय करोना रुग्णांच्या विलगीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या कॅथॉलिक जिमखान्याच्या मैदानावर मुसळधार पावसामुळे सोमवारी तलाव तयार झाल्याने रुग्णांना तातडीने पहिल्या मजल्यावर नेण्यात आले, असेही त्या पदाधिकाऱ्याने सांगितले.