बास्केटबॉल विश्वातील जगप्रसिद्ध एनबीए लीगमध्ये  सॅक्रामेंटो किंग्स संघासाठी भारतीय वंशाचा सॅम भुल्लर नियमितपणे खेळणार आहे. वर्षभरापूर्वी सॅमला सॅक्रामेंटोने आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतले होते. मात्र आता सॅक्रामेंटोने सॅमशी दहा दिवसांचा करार केला असून, त्यांची लढत न्यू ऑरलिन्स पेलिकन्स संघाशी होणार आहे. या स्पर्धेत खेळणारा सॅम भारतीय वंशाचा पहिला खेळाडू ठरणार आहे.
७ फूट ५ इंच अशी निसर्गदत्त उंचीची देणगी लाभलेला सॅम कॅनडास्थित आहे. सॅमचा जन्म होण्यापूर्वीच त्याच्या पालकांनी भारतातून कॅनडाला स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला.
सॅक्रामेंटो संघाचे भारतीय वंशाचे मालक विवेक रणदिवे यांनी सॅमला टोरंटोहून कॅलिफोर्नियाला आणले. सॅम पूर्वी नेवाडास्थित रेना बिर्गोन्स संघासाठी खेळत असे.