ऋषिकेश बामणे

पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल. भारतीय बॅडमिंटनच्या दोन सुवर्णतारका. एकीने ऑलिम्पिक, जागतिक यांसारख्या महत्त्वाच्या स्पर्धामध्ये डौलाने भारताचा तिरंगा फडकावला, तर एकीने चीन-जपान देशांतील खेळाडूंनाही आपण तोडीसतोड झुंज देऊ शकतो, ही बाब सर्वप्रथम सर्वाच्या नजरेत आणून दिली. परंतु गेल्या काही महिन्यांचा काळ दोघांचीही परीक्षा पाहणारा ठरला आहे. टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आठ महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे पुढील वाट अधिक खडतर असून लागोपाठच्या स्पर्धा आणि तंदुरुस्ती राखण्याचे आव्हान अशा दुहेरी अडथळ्यांना सामोरे जातानाच सिंधू-सायनापुढे स्वत:ची कामगिरी उंचावण्याचेही लक्ष्य आहे.

सायनाची स्पर्धा स्वत:शीच

२९ वर्षीय सायनाची कामगिरी सिंधूच्या तुलनेत फारच निराशाजनक झाली आहे. वर्षांच्या सुरुवातीला झालेल्या इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेत सायनाने विजेतेपद मिळवले. परंतु त्यानंतरच्या तब्बल १३ स्पर्धामध्ये सायनाला एकदाही उपांत्य फेरी गाठणे जमलेले नाही.

त्याचप्रमाणे इंडोनेशिया आणि जपान बॅडमिंटन स्पर्धेतून तिने तंदुरुस्तीच्या कारणास्तव माघार घेतली. त्याशिवाय गेल्या दोन महिन्यांतीलच कामगिरीचा आढावा घेतल्यास सायनाचा कोर्टवरील वावर पाहिल्यास तिच्या शरीरातील लवचीकता आणि सहज फटके खेळण्याची कला दिसेनाशी झाली आहे, हे स्पष्ट होते. जवळपास ८-१० वर्षांपूर्वी चीन, जपानच्या खेळाडूंना कडवी झुंज देणारी सायना आता सहज पराभव पत्करताना दिसते. दर आठवडय़ाला रंगणाऱ्या विविध स्पर्धामुळे खेळाडूंसमोर तंदुरुस्ती राखून स्वत:ला दुखापतीपासून दूर ठेवण्याचे आव्हान आहे, हे मान्य असले, तरी क्रमवारीतील खालच्या स्थानावरील खेळाडूंविरुद्धसुद्धा सायनाची कामगिरी निराशाजनकच झाली आहे. जागतिक, ऑल इंग्लंड यांसारख्या महत्त्वाच्या स्पर्धातही ती अपयशी ठरली.

तूर्तास सायना क्रमवारीत नवव्या क्रमांकावर आहे. मात्र एप्रिल २०२०पर्यंत रंगणाऱ्या सर्व स्पर्धा ऑलिम्पिक पात्रतेचा भाग असल्याने सायनाने आताच खेळात सुधारणा न केल्यास तिचे गुण कमी होऊन क्रमवारीतील स्थान घसरण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळेच २०१२च्या ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाची ऑलिम्पिक पात्रतेसाठी स्वत:शीच स्पर्धा असून तिने लवकरच यातून स्वत:ला सावरावे, अशी अपेक्षा आहे.

सायनाची गेल्या पाच स्पर्धामधील कामगिरी

स्पर्धेचे नाव    आव्हान संपुष्टात

कोरिया       पहिली फेरी

डेन्मार्क        पहिली फेरी

फ्रेंच              उपांत्यपूर्व फेरी

चीन              पहिली फेरी

हाँगकाँग         पहिली फेरी

सिंधूसाठी खडतर काळ

‘‘जय-पराजय या दोन्ही गोष्टी खेळाचाच भाग आहेत. परंतु जागतिक विजेतेपद मिळवून मी माझ्या रॅकेटद्वारेच सर्व टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत,’’ अशा कणखर शब्दांत २४ वर्षीय सिंधूने ऑगस्ट महिन्यात झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद मिळवल्यानंतर टीकाकारांवर तोफ डागली होती. परंतु त्यानंतर झालेल्या सर्वच स्पर्धामध्ये कामगिरी ढासळल्याने सिंधू पुन्हा एकदा टीकाकारांच्या केंद्रस्थानी आली आहे.

२०१९ हे वर्ष ऑलिम्पिक पात्रतेसाठी फार महत्त्वाचे आहे. त्यानुसार सिंधूची तयारीही सुरू आहे. परंतु बीडब्ल्यूएफच्या ५०० आणि ७५० सुपर सिरीज स्पर्धाना सिंधू कमी लेखते आहे का, असा प्रश्न निश्चितच मनात येतो. या वर्षांतील एकूण नऊ स्पर्धात सिंधूला उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा ओलांडता आलेला नाही, तर गेल्या सहा स्पर्धामध्ये एकदाही सिंधूला उपांत्य फेरी गाठणे जमलेले नाही. निराशाजनक बाब म्हणजे चीन, डेन्मार्क आणि हाँगकाँग स्पर्धामध्ये क्रमवारीत खालच्या स्थानी असलेल्या खेळाडूंनी सिंधूला सहज धूळ चारली. त्यामुळे सिंधूच्या कामगिरीविषयी चर्चा होणे स्वाभाविक आहे.

जागतिक क्रमवारीत अव्वल १६ क्रमांकावर असलेल्यांना थेट ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची संधी आहे. सिंधू सध्या क्रमवारीत सहाव्या स्थानी असल्यामुळे तिच्या ऑलिम्पिक पात्रतेला फारसा धोका नाही, असे मत राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपिचंद यांनीसुद्धा काही दिवसांपूर्वीच व्यक्त केले. परंतु सिंधूसारख्या अव्वल दर्जाच्या खेळाडूकडून प्रत्येक स्पर्धेत चाहते विजेतेपदाचीच अपेक्षा करतात. त्यामुळे सिंधूने वेळीच स्पर्धाची योग्यपणे निवड करून कामगिरी उंचावली नाही, तर ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन प्रकारात महिला एकेरीत भारताला पदक मिळण्याची शक्यता फार कमी आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

सिंधूची गेल्या पाच स्पर्धामधील कामगिरी

स्पर्धेचे नाव    आव्हान संपुष्टात

कोरिया         पहिली फेरी

डेन्मार्क         दुसरी फेरी

फ्रेंच              उपांत्यपूर्व फेरी

चीन             पहिली फेरी

हाँगकाँग       दुसरी फेरी

सिंधू आणि सायना या दोघीही क्रमवारीत वरच्या स्थानी असल्यामुळे त्यांच्या ऑलिम्पिक पात्रतेला काहीही धोका नाही. प्रत्येक ऑलिम्पिकपूर्वी अनेक नामांकित खेळाडूंच्या कामगिरीत चढ-उतार होत असतात, परंतु महत्त्वाच्या स्पर्धामध्ये कसे खेळायचे, हे या दोघींनाही चांगलेच ठाऊक आहे. विशेषत: सायनाने तंदुरुस्तीकडे अधिक लक्ष द्यावे, असे मला वाटते. त्याशिवाय ‘बीडब्ल्यूएफ’ने लागोपाठच्या स्पर्धा खेळणे सक्तीचे केल्यामुळे खेळाडूंकडे पर्याय नसतो.

– अपर्णा पोपट, माजी बॅडमिंटनपटू

सायना ही भारताच्या सर्वोत्तम बॅडमिंटनपटूंपैकी एक असून तिच्यामध्ये अद्याप जिंकण्याची भूक कायम आहे. फक्त तिने तंदुरुस्तीवर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, तर सिंधू ही विश्वातील अव्वल दर्जाची खेळाडू असून सततच्या स्पर्धामुळे तिच्या कामगिरीवर प्रभाव पडला आहे, असे मला वाटते. मात्र तिचे खेळाकडे दुर्लक्ष झाले आहे, असे अजिबात म्हणता येणार नाही. कारण ती जगज्जेती होण्यापूर्वी ज्या मेहनतीने सराव करायची, तशीच आताही करते.

– प्रदीप गंधे, माजी बॅडमिंटनपटू व संघटक

rushikesh.bamne@expressindia.com