pakistan tour of new zealand 2020 : न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघातील सहा खेळाडूंचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला आहे. न्यूझीलंड क्रिकेट मंडळानं ही माहिती दिली आहे. या सर्व खेळाडूंना सध्या क्वारंटाइन करण्यात आलं आहे. आयसोलेशनदरम्यान होणाऱ्या सराव सत्रावरही निर्बंध लावण्यात आले आहेत. करोनाबाधित झालेल्या सहा खेळाडूंची नावं अद्याप समोर आलेली नाहीत. याआधी न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी पाकिस्तान फलंदाज फखर जमानमध्ये करोनाची लक्षणं आढळली होती. त्यामुळे फखर जमानला न्यूझीलंड दौऱ्यातून वगळण्यात आलं होतं.

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान १८ डिसेंबरपासून दौऱ्याला सुरुवात होणार आहे. यामध्ये तीन टी-२० सामने, दोन कसोटी सामन्याची मालिका होणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी पाकिस्तानचा संघ अतिरिक्त खेळाडूसोबत गेला आहे. पाकिस्तान अ संघही चार दिवसीय दोन सामने खेळणार आहे.

न्यूजीलंड क्रिकेट बोर्डानं सांगितलं की, पॉझिटिव्ह आलेल्या सहा खेळाडूंपैकी दोन खेळाडूंचे रिपोर्ट याआधीही पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये आता चार खेळाडूंची भर पडली आहे. करोनाबाधित झालेल्या सहा खेळाडूंशिवाय पाकिस्तानचा संघ नियमांनुसार सराव करु शकतो. न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी झालेल्या करोना चाचणीमध्ये चारही खेळाडू निगेटिव्ह आले होते.

करोना महामारीमध्ये पाकिस्तान संघाचा हा दुसरा विदेशी दौरा आहे. याआधी पाकिस्तान संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. इंग्लंडमध्ये पाकिस्तान संघाला कसोटी ०-१ नं पराभवचा सामना करावा लागला होता. तर टी-२० मालिका १-१ नं बरोबरीत राखण्यात यश आलं होतं.