बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने ९१ धावांनी विजय मिळवला. फलंदाज कुशल परेराने केलेल्या शतकी खेळीच्या बळावर श्रीलंकेने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या विजयासह ‘यॉर्कर किंग’ लसिथ मलिंगाने एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीचा शेवट गोड केला. तसेच त्याने भारताचा फिरकीपटू अनिल कुंबळे याचा विक्रम मोडत एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.

२२६ सामन्यांमध्ये ३३८ बळी मिळवून एकदिवसीय क्रिकेटला अलविदा करणाऱ्या लसिथ मलिंगाला श्रीलंकेने गोड निरोप दिला. यासोबतच त्याने निवृत्त होताना अनिल कुंबळेचा एक विक्रम देखील मोडीत काढला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनिल कुंबळेने ३३७ बळी टिपले होते. मलिंगाने सामन्यात ३ बळी टिपून एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३३८ बळी मिळवले आणि एकदिवसीय कारकिर्दीतून अभिमानाने निवृत्ती स्वीकारली. त्याने २२६ सामन्यात आणि २२० डावात हा पराक्रम केला.

दरम्यान, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सामन्यात कुशल परेराने ९९ चेंडूत १११ धावांची खेळी केली. यात त्याने १७ चौकार आणि १ षटकार लगावला. अँजेलो मॅथ्यूज (४८) आणि कुशल मेंडिस (४३) या दोघांनीही श्रीलंकेच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे श्रीलंकेला त्रिशतकी मजला मारता आली. ५० षटकात श्रीलंकेने ८ बाद ३१४ धावा केल्या.

या आव्हानाचा पाठलाग करताना मुशफिकुर रहीम (६७) आणि शब्बीर रेहमान (६०) या दोघांनी सामना जिंकण्याचा प्रयत्न करण्याच्या दृष्टीने खेळी केली. पण इतर कोणालाही चांगली खेळी करता आली नाही. बांगलादेशच्या ५ खेळाडूंना तर दोन आकडी धावसंख्यादेखील गाठणे शक्य झाले नाही. त्यामुळे बांगलादेशचा डाव २२३ धावांवर संपुष्टात आला.