बॉक्सिंग हा खेळ गरीब आणि वंचित मुलांमध्ये जास्त प्रमाणात रुजवण्याची गरज आहे. कारण समाजातील वंचित आणि गरीब मुलांमध्येच संघर्षाची सर्वाधिक ताकद असते असं मत जगविख्यात मुष्टियोद्धा माईक टायसनने व्यक्त केलं. माईक टायसन मुंबई दौऱ्यावर आला आहे. मुंबईत आयोजित मिक्स मार्शल आर्ट लीगचं उद्घाटन टायसनने केलं त्यावेळी त्याने हे विचार बोलून दाखवले.

बॉक्सिंग सारख्या खेळाचा प्रचार स्लम्समध्ये जास्त प्रमाणात व्हायला हवा असं मला वाटतं कारण या मुलांमध्ये बॉक्सिंगला लागणाऱ्या संघर्षाची ताकद सगळ्यात जास्त असते. आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी पराभवाचा सामना करावा लागतो. मात्र तुम्ही हिंमत न हारता लढा द्यायला हवा असंही मत माईक टायसनने व्यक्त केलं.

२९ सप्टेंबरपासून मिक्स मार्श आर्ट लीग वरळीच्या एनएससीआय डोममध्ये सुरु होणार आहे. या लीगला अखिल भारतीय मिश्रित मार्शल आर्ट्स फाऊंडेशन आणि विश्व किक बॉक्सिंग महासंघानेही मान्यता दिली आहे. या लीगच्या पहिल्या सत्रात विविध देशांचे आठ संघ सहभागी होणार आहेत.

माईक टायसनला सलमान खानने पार्टीसाठी निमंत्रित केलं. त्याबद्दल त्याला प्रश्न विचारण्यात आला. तू सलमान खानच्या पार्टीला जाणार की मुंबईच्या झोपडपट्टीत? त्यावर टायसन म्हटला, मी झोपडपट्टीत जाणार. याचं कारण विचारलं असता तो म्हटला की मी देखील अशाच कुटुंबात जन्माला आलो. मी सुद्धा स्लमडॉग होतो. मला झोपडपट्टीतून बाहेर पडायचं होतं. त्यामुळे मी संघर्ष केला. त्याचमुळे मी झोपडपट्टीला भेट देणार आहे असंही टायसननं म्हटलं. माईक टायसन मुंबईत दाखल होताच त्याच्या सुरक्षेची जबाबदारी सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने घेतली आहे. सलमान खानच्या संमतीनेच आपण टायसनची सुरक्षा करत असल्याचेही शेराने सांगितले. शेरा टायसनला एअरपोर्टवर घ्यायलाही गेला होता.