ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली आणि शिखर धवन यांनी शतके झळकावली होती. त्या वेळी भारतीय फलंदाज हे विक्रमांच्या मागे धावणारे असतात, ते स्वार्थी आहेत, अशी टीका ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने केली होती. पण या टीकेचे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथ आणि सलामीवीर आरोन फिन्च यांनी समर्थन केले नाही.

‘‘भारतीय खेळाडू स्वार्थी असल्याची टीका मॅक्सवेलने केली असली तरी तो त्याचा वैयक्तिक दृष्टिकोन आहे. माझा दृष्टिकोन मात्र तसा नाही. कोहली, धवन, रोहित हे दर्जेदार फलंदाज आहेत. त्यांनी चांगली फलंदाजी केली आहे,’’ असे फिन्चने सांगितले.

याबाबत स्मिथ म्हणाला की, ‘‘जेव्हा एखाद्या विक्रमाचा विचार डोक्यात येतो तेव्हा थोडा संथ खेळ पाहायला मिळतो, पण ते नैसर्गिक आहे. कोहली आणि रोहित हे चांगले क्रिकेटपटू आहेत. त्यांच्याकडून कधीही स्वार्थीपणा मी पाहिलेला नाही.’’

खेळपट्टय़ांबाबत स्मिथ नाराज

‘‘आम्हाला या मालिकेत सर्व ठिकाणी पाटा खेळपट्टय़ा मिळाल्या. ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टय़ांमध्ये चांगला वेग आणि उसळी पाहायला मिळते. पण या चारही सामन्यांमध्ये खेळपट्टय़ांचा नैसर्गिक पोत पाहायला मिळाला नाही आणि त्यामुळेच मी नाराज आहे,’’ असे स्मिथ म्हणाला.