सोमदेव देववर्मनला पराभवाचा धक्का
केपीआयटी एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत एकिकडे युकी भांब्रीला निसटता विजय मिळवता आला असला तरी सोमदेव देववर्मनला मात्र पराभवाचा धक्का बसला आहे. सोमदेवसह भारताच्या सनमसिंग, सुमित नागल, विष्णू वर्धन, रामकुमार रामनाथन, प्रजनीश गुणशेखरन यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत युकीने सर्बियाच्या निकोला मिलोजेविकचा ४-६, ६-२, ६-४ असा पराभव केला. पहिल्या सेटमध्ये युकीला अपेक्षेइतका वेगवान खेळ करता आला नाही. त्याची सव्‍‌र्हिस भेदण्यात निकोला याला यश मिळाले. दुसऱ्या सेटमध्ये युकीला सूर गवसला. त्याने सव्‍‌र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण मिळविले. त्याने दुसऱ्या सेटमध्ये दोन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. हा सेट घेत त्याने सामन्यात उत्कंठा निर्माण केली. तिसऱ्या सेटमध्ये पुन्हा रंगतदार लढत पाहावयास मिळाली. मात्र युकीने क्रॉसकोर्ट फटक्यांचा उपयोग करीत त्याची सव्‍‌र्हिस तोडली. त्याने हा सेट घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.
विजय प्रशांत सुंदरने जागतिक क्रमवारीत १८१व्या स्थानी असलेल्या सोमदेव देववर्मनला पराभवाचा धक्का दिला. खणखणीत फोरहँड आणि जमिनीलगतच्या अचूक फटक्यांच्या जोरावर प्रशांतने या लढतीत कारकीर्दीतील संस्मरणीय विजय साकारला. सुंदरने ही लढत ७-५, ६-२ अशी जिंकली. डेव्हिस चषकात थरारक विजय मिळवत सोमदेवने भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. या स्पध्रेत अग्रमानांकित युकी भांब्रीच्या बरोबरीने सोमदेव जेतेपदाचा प्रबळ दावेदार होता. मात्र सुंदरने त्याचे आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आणले.
इंग्लंडचा डेव्हिसपटू जेम्स वॉर्डने वर्धनचे आव्हान ३-६, ६-३, ६-४ असे संपुष्टात आणले. बेलारुसच्या इलिया इवाश्काने विजयी वाटचाल करताना सुमितवर ७-५, ६-३ अशी मात केली.
रामकुमारला स्पेनच्या अँड्रियन मॅसेरिआसने ७-६ (८-६), ७-६ (७-५) असे संघर्षपूर्ण लढतीनंतर हरवले. पहिल्या सेटमध्ये परतीचे ताकदवान फटके व नेटजवळून अचूक प्लेसिंग असा चतुरस्र खेळ करीत रामकुमारने ५-२ अशी आघाडी घेतली होती. त्या वेळी अँड्रियनने विविध मार्गानी त्याचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. त्याचे हे डावपेच यशस्वी ठरले. चीन तैपेईच्या चेन तेई याने प्रजनीश याचा ६-७ (४-७), ६-१, ६-१ असा पराभव केला. सनमसिंगला रशियाच्या अ‍ॅलेक्झांडर कुद्रियात्सेवने ६-४, ६-२ असे पराभूत केले.