भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याने शनिवारी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी सकाळी जिममध्ये व्यायाम करत असताना त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली आणि त्याला रूग्णालयात घेऊन जाण्यात आले. दक्षिण कोलकाता येथील वूडलँड या खाजगी रूग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. सोमवारी हॉस्पिटलमधील नऊ डॉक्टर्सच्या टीमने गांगुलीच्या प्रकृतीची नीट माहिती घेतली. यावेळी डॉ. देवी शेट्टी, डॉ. आरके पंडा हे व्हिडीओद्वारे तर डॉ. सॅम्युअल मॅथ्यू फोनद्वारे या टीमशी जोडले गेले होते. त्यानंतर सौरव गांगुलीच्या प्रकृतीबाबतची महत्त्वाची अपडेट देण्यात आली.

सौरव गांगुली याची प्रकृती स्थिर असून उद्या (बुधवारी) त्याला रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल. गांगुलीली घरी सोडल्यानंतर डॉक्टरांकडून त्याच्या प्रकृतीची रोज माहिती घेतली जाणार आहे असं सांगण्यात येत आहे. “गांगुलीच्या स्वास्थ्यासंदर्भात डॉ. अश्विन मेहता (जसलोक, मुंबई) आणि डॉ. शामिन के शर्मा (माऊंट सिनाई, न्यूयॉर्क) यांचा सल्ला घेण्यात आला आहे. संचालक मंडळाकडून गांगुलीच्या वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल आणि प्रकृतीची पाहणी करण्यात आली आहे. हृदयविकाराचा झटका आलेला असताना वेळीच मिळालेल्या उपचारांमुळे गांगुलीची प्रकृती आता चांगली आहे. तज्ज्ञांच्या बैठकीत गांगुलीच्या हृदयातील आणखी दोन ब्लॉकेजेसबद्दलही चर्चा करण्यात आली. अँजिओप्लास्टी लांबणीवर टाकणे हा सध्याच्या घडीला सुरक्षित पर्याय आहे यावर तज्ज्ञांचे एकमत झाले. गांगुलीच्या छातीत दुखत नसून त्याची प्रकृती स्थिर आहे. पुढील १५ दिवसांत अँजियोप्लास्टी करण्यात येईल”, अशी माहिती रूग्णालयाकडून देण्यात आली.

आणखी वाचा- टोमणा मारत गांगुलीला दिल्या Get Well Soon च्या शुभेच्छा, किर्ती आझादांवर भडकले ‘दादा’चे चाहते

सौरव गांगुलीची पत्नी डोना गांगुली आणि भाऊ स्नेहाशिष दोघेही या बैठकीत उपस्थित होते. गांगुलीचा आजार कशापद्धतीचा होता आणि त्याची कशी काळजी घेणं गरजेचं आहे याबद्दल त्यांना माहिती देण्यात आली. तसेच, गांगुली ICUमध्ये असल्याने त्याला भेटण्याची परवानगी देण्यात येत नाही. पण गांगुलीला भेटायला येत असलेल्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात एक वेगळा विभाग तयार करण्यात आला असून तिथे त्यांना गांगुलीच्या प्रकृतीची माहिती दिली जात आहे.