ख्रिस मॉरिसची निर्णायक खेळी; इंग्लंडवर ३ विकेट्स राखून विजय

अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसने पुन्हा एकदा निर्णायक खेळी करून अखेरच्या चेंडूंवर दक्षिण आफ्रिकेला रोमहर्षक विजय मिळवून दिला. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात आफ्रिकेने ३ विकेट्स राखून विजय मिळवला. अखेरच्या षटकात विजयासाठी १५ धावांची आवश्यकता असताना मॉरिसने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत दमदार खेळ केला. इंग्लंडचे १३४ धावांचे लक्ष्य आफ्रिकेने ७ बळींच्या मोबदल्यात पार केले. चार बळी टिपणाऱ्या इम्रान ताहीरला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

रिस टोप्लेच्या अखेरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कायले अ‍ॅबॉटने एक धाव काढून मॉरिसला स्ट्राईक दिली. त्यानंतर मॉरिसने चौकार व षटकार खेचून सामन्यात रंजकता निर्माण केली. चौथा चेंडू निर्धाव गेल्यामुळे विजयासाठी दोन चेंडूंत ४ धावा असे आव्हान आफ्रिकेसमोर उभे राहिले. मॉरिसने पुढील चेंडूवर दोन धावा काढल्या. अखेरच्या चेंडूंवर दोन धावांची आवश्यकता असताना मॉरिसने लाँग ऑफला चेंडू तटवला. टोप्लेने अ‍ॅबॉटला धावचीत करण्याची संधी गमावल्यामुळे आफ्रिकेने विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मॉरिसने ७ चेंडूंत एक चौकार व एक षटकार खेचून नाबाद १७ धावांची खेळी केली. तत्पूर्वी, अ‍ॅलेक्स हेल (२७) आणि जोस बटलर (नाबाद ३२) यांच्या खेळाच्या जोरावर इंग्लंडने ८ बाद १३४ धावांचे लक्ष्य उभे केले.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड : ८ बाद १३४ (अ‍ॅलेक्स हेल्स २७, जोस बटलर नाबाद ३२; इम्रान ताहीर ४-२१, कायले अ‍ॅबॉट २-३१) पराभूत वि. दक्षिण आफ्रिका : ७ बाद १३५ (हाशिम अमला २२,  फॅफ डू प्लेसिस २५, जे. पी. डय़ूमिनी २३, ख्रिस मॉरिस नाबाद १७; ख्रिस जॉर्डन ३-२३).