जयपूरच्या मैदानावर क्रीडामंत्र्यांची सरप्राईज व्हिजिट, गलथान कारभारावरुन अधिकाऱ्यांना सुनावलं क्रीडा मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यापासून राज्यवर्धनसिंह राठोड यांनी आपल्या कामातून टीकाकारांना उत्तर द्यायला सुरुवात केली. जयपूरच्या विद्याहर नगर मैदानाला अचानक भेट देत राज्यवर्धनसिंह राठोड यांनी क्रीडापटूंना मिळणाऱ्या सोयी-सुविधांचा आढावा घेतला. या भेटीनंतर मैदानाच्या स्वच्छतेबद्दल आणि खेळाडूंना मिळणाऱ्या अन्नाबद्दल राज्यवर्धनसिंह राठोड यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

अवश्य वाचा – क्रीडामंत्र्यांनी घेतली ‘साई’च्या अधिकाऱ्यांची परेड, खेळाडू हेच व्हीआयपी !

मैदानातील प्रशिक्षक आणि कर्मचारी वर्गाशी बोलतानाची काही छायाचित्रे राठोड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहेत.
यावेळी मैदानातील सर्व सोयी-सुविधांची काळजी घेणाऱ्या ‘साई’च्या (Sports Authority of India) अधिकाऱ्यांना राज्यवर्धन सिंह राठोड यांनी चांगलचं सुनावलं. विद्याहर नगर मैदानाची परिस्थिती लवकरात लवकर सुधारली पाहिजे, अशी सूचना राठोड यांनी ‘साई’च्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

२००४ साली अथेन्स ऑलिम्पिकमध्ये डबल ट्रॅप शूटिंग प्रकारात राज्यवर्धनसिंह राठोड यांनी रौप्य पदकाची कमाई केली होती. याआधीही राठोड यांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु मैदानाची पाहणी करत साईच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. नुकतंच राठोड यांनी ‘खेलो इंडिया’ या अभियानाची घोषणा केली असून, यात तब्बल १ हजार शाळकरी विद्यार्थ्यांना ८ वर्षांपर्यंत क्रीडा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक वर्षी ५ लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे.