भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला खेळाडूच्या नावाची, देशातील दुसऱ्या सर्वोच्च मानाच्या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सहा वेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी बॉक्सर मेरी कोमचं नाव पद्मविभूषण पुरस्कारासाठी सुचवलं आहे. याआधी मेरी कोमला २०१३ साली पद्मभूषण तर २०१६ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इतर पद्म पुरस्कारांसाठीही क्रीडा मंत्रालयाने यंदा महिला खेळाडूंचं नावच पुढे केलं आहे.

जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचं जेतेपद पटकावणाऱ्या पी.व्ही.सिंधूला पद्मभूषण तर कुस्तीपटू विनेश फोगट, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर आणि हॉकीपटू राणी रामपाल, नेमबाजपटू सुमा शिरुर, टेबल टेनिसस्टार मनिका बत्रा आणि ताशी-नुंगशी या जुळ्या बहिणींचं नाव पद्मश्री पुरस्कारासाठी सुचवण्यात आलं आहे. २०१७ साली पी.व्ही.सिंधूचं नाव पद्मभूषण पुरस्कारासाठी सुचवण्यात आलं होतं, मात्र अंतिम यादीत तिला स्थान मिळू शकलं नाही. २०१५ साली सिंधूला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

आतापर्यंत ३ क्रीडापटूंना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. विश्वनाथन आनंद, सचिन तेंडुलकर आणि सर एडमंड हिलरी यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. क्रीडा मंत्रालयाने या सर्व खेळाडूंची यादी गृह मंत्रालयाने पाठवली आहे. आगामी प्रजासत्ताक दिनाआधी अंतिम यादी जाहीर केली जाईल. त्यामुळे या यादीतील किती महिला खेळाडूंच्या नावावर अंतिम मोहर उमटवली जात आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.