भारतीय संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेत निराशाजनक कामगिरी झाली असली तरी आयपीएलच्या धर्तीवर आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवण्यासाठी सनसारझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर सज्ज झाला आहे. आयपीएलचे जेतेपद आपल्याकडेच राखण्याचा विश्वास वॉर्नरने व्यक्त केला. आयपीलच्या मागच्या पर्वात वॉर्नरने लक्षवेधी कामगिरी करत संघाला विजेतेपद प्राप्त करून दिले होते. तर उपविजेता संघ ठरलेल्या बंगळुरूच्या रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध आज हैदराबादचा पहिला सामना होणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘इंडिया टूडे’शी बोलताना वॉर्नरने यंदाही स्पर्धेचे जेतेपद हैदराबादकडेच राहिल असा विश्वास व्यक्त केला.

मागील पर्वाचा विजेता संघ म्हणून तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी असते. आयपीएलच्या मागच्या पर्वामुळे आम्हाला खूप आत्मविश्वास मिळाला. स्पर्धेच्या जेतेपदावर पुन्हा एकदा नाव कोरण्याची क्षमता आमन्यात नक्कीच आहे, असे वॉर्नर म्हणाला.

 

प्रतिस्पर्धी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभूत करणे हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे यश ठरेल. स्पर्धेत दमदार सुरूवात मिळविण्यासाठी हा सामना नक्कीच महत्त्वाचा आहे. मागील पर्वात आम्ही कमीतकमी धावांचा सामना देखील खेचून आणला होता. त्यामुळे परिस्थितीनुसार कामगिरी करण्याची चांगली क्षमता आमच्या संघातील खेळाडूंमध्ये आहे. यंदाही संघातील खेळाडू त्याहीपेक्षा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील, असेही वॉर्नर म्हणाला.

संघातील ताळमेळ यावर बोलताना वॉर्नरने भारतीय खेळाडूंचे कौतुक केले. युवराज सिंग, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार आणि आशिष नेहरा यांसारखे उच्च दर्जाचे भारतीय खेळाडू संघात असल्यामुळे संघ खूप मजबूत आहे. यंदाही प्रतिस्पर्ध्यांचे प्रत्येक आव्हान आम्ही मोडून काढू, असेही वॉर्नर म्हणाला.