श्रीलंकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू धनंजय डी सिल्वाच्या वडीलांवर श्रीलंकेत अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. कोलंबो शहरातील रत्मालना भागात हा हल्ला घडला असून या गोळीबारात धनंजय डी सिल्वाचे वडील रंजन यांचा जागीच मृत्यू झालेला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे श्रीलंकेचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी ही दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केली असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये. धनंजय डी सिल्वाचे वडील रंजन हे श्रीलंकेत स्थानिक राजकारणी आहेत.

३ कसोटी सामन्यांसाठी श्रीलंकेचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रवाना होणार होता. मात्र त्याआधीच ही घटना घडल्याने डीसिल्वाने माघार घेतली आहे, श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने डीसिल्वाऐवजी संघात कोणत्याही खेळाडूला जागा दिली नाहीये. धनंजय डीसिल्वासोबत दिमुथ करुणारत्नेही दुखापतीमुळे दौऱ्यातून माघार घेतली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यात श्रीलंकेचा संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.