भारताच्या किदम्बी श्रीकांतला डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला. श्रीकांतला दुसऱ्या मानांकित चाओ चेनकडून २२-२०, १३-२१, १६-२१ अशी हार पत्करावी लागली.

श्रीकांतच्या पराभवासोबत भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. सात महिन्यानंतर या स्पर्धेद्वारे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनला प्रारंभ झाला होता. तसेच या वर्षांतील ही अखेरची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा होती. २०१७मध्ये डेन्मार्क स्पर्धा जिंकणाऱ्या श्रीकांतवरच भारताच्या सर्वाधिक अपेक्षा होत्या. श्रीकांतने त्याप्रमाणे चेनविरुद्ध चुरशीचा रंगलेला पहिला गेम जिंकला. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या गेममध्ये पाचवा मानांकित श्रीकांतला पराभव स्वीकारावा लागला.

चेनने नेहमीप्रमाणे आक्रमक आणि ताकदीचे फटके खेळून त्याचे कौशल्य दाखवले. श्रीकांतने बऱ्यापैकी त्याच्या आक्रमणाचा सामना केला. मात्र चेनचा अनुभव सरस ठरला. या स्पर्धेत भारताकडून याआधी अजय जयराम, लक्ष्य सेन हे उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारू शकले नाहीत. लक्ष्यकडूनही या स्पर्धेत अपेक्षा होत्या. लक्ष्यने गेल्यावर्षी पाच विजेतेपदे पटकावली होती. मात्र दुसऱ्या फेरीचा अडथळा त्याला पार करता आला नाही.