समुद्रसपाटीपासून १३३४ मीटर उंचीवर असलेल्या पांचगणीमधील ‘टेबल लॅण्ड’ हे मोठे सपाट पठार पर्यटकांना नेहमीच भुरळ घालते. याच्याच पायथ्याशी वसलेल्या ऐतिहासिक पांचगणी व्यायाम मंडळाच्या क्रीडांगणावर शनिवारपासून रंगणारी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा म्हणजे पांचगणीमधील आणि आसपासच्या गावांसाठी जणू पर्वणीच असणार आहे. या स्पध्रेच्या निमित्ताने पांचगणीवासीयांना अव्वल कबड्डीपटूंचा थरार पाहण्याची संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या या कबड्डी स्पध्रेत पुरुष विभागात पुणे पोलीस, हिंदुजा हॉस्पिटल, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, ठाणे पोलीस, मुंबई पोस्टल, एअर इंडिया, इंडियन गार्मेट, मुंबई बंदर, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, बँक ऑफ इंडिया, रिझव्‍‌र्ह बँक, रेल्वे पोलीस आणि जे. जे. हॉस्पिटल असे १४ संघ सहभागी होणार आहेत.
याचप्रमाणे महिला विभागात शिरोडकर क्लब, महर्षी दयानंद स्पोर्ट्स क्लब, संघर्ष क्रीडा मंडळ, सावित्री क्रीडा मंडळ, जिजाऊ क्रीडा मंडळ, ओम क्रीडा मंडळ, शिवाई क्रीडा मंडळ, सुवर्णयुग स्पोर्ट्स क्लब, एमडी स्पोर्ट्स क्लब, राणी लक्ष्मीबाई संघ, भालचंद्र क्रीडा मंडळ आणि श्रीकृष्ण क्रीडा मंडळ असे १२ संघ भाग घेणार आहेत.
राज्यपातळीवरील व्यावसायिक पुरुष आणि महिला गटात होणाऱ्या या स्पध्रेतील विजेत्या, उपविजेत्या आणि उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघाला रोख पारितोषिके आणि चषक देण्यात येईल. याचप्रमाणे स्पध्रेतील सर्वोत्तम खेळाडूला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात येईल. तसेच स्पध्रेतील सर्वोत्तम चढाईपटू आणि पकडपटूलाही बक्षीस देण्यात येणार आहे.