आधुनिक क्रिकेटमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांची कायम तुलना केली जाते. आजपर्यंत अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण एका चाहत्याने थेट स्टीव्ह स्मिथलाच जगातील सर्वोत्तम वन डे फलंदाज कोण? असा प्रश्न विचारला. त्यावर स्टीव्ह स्मिथने आढेवेढे न घेता एका खेळाडूचं नाव सांगितलं.

स्टीव्ह स्मिथने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साऱ्या चाहत्यांसाठी प्रश्नोत्तराचं खुलं सत्र घेतलं. या प्रश्नोत्तराच्या सत्रात त्याला अनेकांनी अनेक प्रश्न विचारले. त्यापैकी निवड प्रश्न आणि त्याची उत्तरं त्याने स्क्रीनशॉट म्हणून इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केली. त्यात एका चाहत्याने त्याला जगातील सर्वोत्तम वन डे फलंदाज कोण? असा प्रश्न विचारला. त्यावर स्मिथने, “सध्याच्या घडीला विराट कोहली”, असं थेट उत्तर दिलं.

त्यानंतर एका चाहत्याने त्याला विचारलं की केएल राहुलबद्दल एका शब्दात काय सांगशील? त्यावर त्याने उत्तर दिलं की गन (बंदुक)… लोकेश राहुलचा खेळ हा एखाद्या बंदुकीप्रमाणे असतो. तो गोळीच्या वेगाने फटकेबाजी करतो असं त्याने या उत्तरातून स्पष्टपणे सांगितलं.

ऑस्ट्रेलियाला टी२० मालिकेत नडलेला जोस बटलर याच्याबद्दल पण स्मिथला प्रश्न विचारण्यात आला. त्याच्याबद्दल उत्तर देताना स्मिथने आपली विनोदबुद्धी दाखवून दिली. बटलरबद्दल बोलताना तो म्हणाला, “तो अप्रतिम फलंदाज आहे. पण येत्या आठवड्यात (इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वन डे मालिका) त्याने फारशा धावा करू नयेत अशी माझी अपेक्षा आहे. त्यानंतर त्याने IPLमध्ये गोलंदाजांची हवी तेवढी धुलाई करावी”, असे उत्तर स्मिथने दिले.

स्टीव्ह स्मिथ आणि जोस बटलर दोघेही IPLमध्ये राजस्थानच्या संघाकडून खेळतात.