ICC Test Rankings : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची आयसीसी कसोटी क्रमवारीत घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथने धडाकेबाज कामगिरी करत विराट कोहलीकडून अव्वल स्थान हिसकावले आहे. आयसीसी क्रमवारीत ९०४ गुणांसह ऑस्ट्रेलियाचा स्मिथ अव्वल स्थानावर आहे. तर ९०३ गुणांसह विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे.

अॅशेस मालिकेत स्मिथने सातत्याने धावा जमावल्या.विराट कोहलीला मात्र आपल्या फलंदाजीत सातत्य राखता आले नाही. त्यामुळेच क्रमवारीत विराट कोहलीची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. आयसीसीने मंगळवारी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय खेळाडूंचं वर्चस्व असल्याचे दिसून आले. मात्र गेल्या वर्षाभरापासून निर्विवाद अव्वल स्थानी असलेल्या विराट कोहलीची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. बुमराहला विडिंजमधील कामगिरीचा फायदा झाला आहे. गोलंदाजीत बुमराहने तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. फलंदाजी क्रमवारीत अव्वल दहांमध्ये तीन भारतीयांचा समावेश आहे. विराट कोहलीशिवाय पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी अव्वल दहांमध्ये स्थान मिळवलं आहे. गोलंदाजीमध्ये बुमराह तिसऱ्या स्थानावर आहे. तर जाडेजाची ११ व्या स्थानी घसरण झाली आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये जाडेजा चौथ्या तर अश्विन सातव्या स्थानावर आहेत.

स्मिथने कसोटीमध्ये पुनरागमन करताना अॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यातील दोन्ही डावांत शतक झळकावलं होतं. तर दुसऱ्या कसोटीमध्ये जखमी झाल्यानंतरही ९२ धावांची खेळी केली होती. दोन शतकी आणि एक अर्धशतकी खेळीच्या जोरावर स्मिथने अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. दुसरीकडे विडिंजबरोबर चार डावांत फलंदाजी करताना विराट कोहलीला फक्त दोन अर्धशतकं झळकावता आली आहेत.

अशी आहे आयसीसीची कसोटी क्रमवारी –

१) स्टिव्ह स्मिथ – ऑस्ट्रेलिया (९०४ गुण)

२) विराट कोहली – भारत (९०३ गुण)

३) केन विल्यमसन – न्यूझीलंड (८७८ गुण)

४) चेतेश्वर पुजारा – भारत (८२५ गुण)

५) हेन्री निकोलस – न्यूझीलंड (७४९ गुण)

६) जो रुट – इंग्लंड (७२६ गुण)

७) अजिंक्य रहाणे – भारत (७२५ गुण)

८) टॉम लेथम – न्यूझीलंड (७२४ गुण)

९) दिमुथ करुणारत्ने – श्रीलंका (७२३)

१०) एडन मार्क्रम – दक्षिण आफ्रिका (७१९ गुण)