ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने कारकीर्दीतील २३वे शतक पूर्ण करत अ‍ॅशेस मालिकेतील चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंडला विजयापासून वंचित ठेवले. शेवटच्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ४ बाद २६३ धावा केल्या आणि सामना अनिर्णित सोडवण्यात यश मिळवले.

ऑस्ट्रेलियाने २ बाद १०३ धावसंख्येवर दुसरा डाव पुढे सुरू केला. डेव्हिड वॉर्नर (८६) व स्मिथ यांनी आत्मविश्वासाने झुंजार खेळ करत तिसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी रचली. स्मिथने शतक करून अनेक विक्रम नोंदवले. मेलबर्न मैदानावर लागोपाठ चार सामन्यांमध्ये शतक करण्याचा मान यापूर्वी सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर होता. या विक्रमाशी स्मिथने बरोबरी केली. तसेच एकाच वर्षांत सहा शतके करण्याच्या माजी कर्णधार रिकी पॉटिंगच्या विक्रमाशीही त्याने बरोबरी केली.

जो रुटने वॉर्नरला बाद करत ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर आलेल्या शॉन मार्शला झटपट बाद करत इंग्लंडने यजमानांना आणखी एक धक्का दिला. पण, मिचेल मार्शने (नाबाद २९) चिवट खेळ केला आणि स्मिथला चांगली साथ दिली. स्मिथने शतक पूर्ण केल्यानंतर दोन्ही संघांनी सामना अनिर्णित ठेवण्याचा निर्णय घेतला. स्मिथने ४३८ मिनिटांच्या खेळात २७५ चेंडूंना सामोरे जात सहा चौकारांच्या जोरावर नाबाद १०२ धावा केल्या. पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिले तीन सामने जिंकून ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. पाचवा सामना पुढील आठवडय़ात सिडनी येथे सुरू होणार आहे.

संक्षिप्त धावफलक 

  • ऑस्ट्रेलिया -पहिला डाव : ३२७ आणि दुसरा डाव : १२४.२ षटकांत ४ बाद २६३ (स्टीव्हन स्मिथ नाबाद १०२, डेव्हिड वॉर्नर ८६).
  • इंग्लंड (पहिला डाव ) :४९१.