ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि जगविख्यात फिरकी गोलंदाज शेन वॉर्न यांच्यातील वादाला पुन्हा नव्याने फोडणी मिळाली आहे. वॉर्नने लिहलेल्या ‘नो स्पिन’ पुस्तकाच्या प्रकाशनानंतर वॉर्नने स्टीव्ह वॉ याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. स्टीव्ह हा संघहितापेक्षा स्वत:ची सरासरी जपणारा स्वार्थी कर्णधार होता, असा आरोप वॉर्नने केला आहे.

या पुस्तकामध्ये वॉर्नने ब्रॅडमन यांच्या काळातील इंग्लंडचा कर्णधार डग्लस जार्डिनने ‘बॉडीलाइन’ गोलंदाजी टाकण्यास लावल्याबद्दलच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. ‘‘ब्रॅडमनसारख्या फलंदाजांना रोखण्यासाठी जार्डिनने तसे करणे हे धैर्याचे आणि खेळाचे परिमाणच बदलणारे होते,’’ असे वॉर्नने म्हटले आहे.

इंग्लंडच्या या तत्कालीन कर्णधाराला ऑस्ट्रेलिया नेहमी खलनायक ठरवत आली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली हेरॉल्ड लारवूडने शरीरवेधी गोलंदाजी करीत इंग्लंडला ती मालिका ४-१ अशी जिंकून दिली होती. या सर्व पार्श्वभूमीवर वॉर्नने त्याच्या पुस्तकात इंग्लंडच्या जार्डिनचे समर्थन करताना एकेकाळचा त्याचा सहकारी आणि कर्णधार स्टीव्ह वॉ याच्यावर मात्र कठोर शब्दांत ताशेरे ओढले असून त्याच्यावर स्वार्थीपणाचा आरोप केला आहे. या पुस्तकामुळे उकरला गेलेला हा वाद अधिक चिघळण्याची चिन्हे आहेत.