बॉल कुरतडल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने कप्तान स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर व  कॅमेरॉन बँकरॉफ्ट या तिघांना दक्षिण अफ्रिकेतून मायदेशी परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने जोहान्सबर्ग येथे पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला.या तिघांचा यापुढील दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्याशी काहीही संबंध राहणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी संपूर्ण चौकशी करण्यात येत असून सविस्तर कारवाईबाबत तीन दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक डेरेन लेहमनयाची निर्दोश मुक्तता करण्यात आली असून दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही तेच प्रशिक्षक म्हणून कायम राहणार आहेत.

माध्यमांशी बोलताना सदरलँड यांनी सांगितले, क्रिकेट ऑस्ट्रेलियासाठी रविवारनंतरचा दिवस हा खूपच कठीण राहिला आहे. मी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्यावतीने देशवासीय आणि क्रिकेट चाहत्यांची माफी मागतो. विशेष करुन त्या मुलांची जे क्रिकेटवर प्रेम करतात. हा डाग क्रिकेट ऑस्ट्रेलियासाठी दुःखद आहे. आमची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. स्टीव स्मिथ, डेविड वॉर्नर आणि कॅमरुन बॅनक्रॉफ्ट हे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नियमावलीतील कलम २.३.५ नुसार नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात येत आहे.

सदरलँड म्हणाले, हे तिन्ही खेळाडू बुधवारी स्वदेशी परततील. यांच्या जागी आता मॅट रेनशॉ, ग्लेन मॅक्सवेल आणि जो बर्न्स ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून खेळतील. टिम पेनची कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. दरम्यान, स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर आयपीएल आणि वर्षाअखेर होणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन बाहेर पडण्याचीही शक्यता आहे. सदरलँडने सांगितले की, पुढच्या २४ तासांत दोषी खेळाडूंविरोधात शिक्षेची घोषणा होऊ शकते.

उल्लेखनीय बाब ही आहे की, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान झालेल्या चेंडूसोबत छेडछाडीवरुन निर्माण झालेल्या वादाच्या चौकशीसाठी दक्षिण अफ्रिकेला पोहोचले होते. त्यांनी जोहान्सबर्ग येथे पोहोचल्यानंतर ऑस्ट्रेलियन टीमचे प्रशिक्षक डैरेन लेहमन, कर्णधार स्टिव स्मिथ यांच्याशी संवाद साधल्यानंतर याबाबत निर्णय घेतला. दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील मालिकेतील शेवटचा कसोटी सामना शुक्रवारपासून जोहान्सबर्गमध्येच होणार आहे.