उरुग्वेचा आघाडीचा फुटबॉलपटू लुइस सुआरेझला करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे ब्राझीलविरुद्ध होणाऱ्या विश्वचषक फुटबॉलच्या पात्रता फेरीच्या लढतीला सुआरेझ मुकणार आहे. ब्राझीलकडून नेयमारदेखील दुखापतीमुळे खेळू शकणार नाही.

ख्रिस्तियानो रोनाल्डो, नेयमार या फुटबॉल जगतातील अव्वल खेळाडूंनाही याआधी करोनाची लागण झाली होती. त्यात आता सुआरेझची भर पडली आहे. ला-लिगामध्ये सुआरेझ अ‍ॅटलेटिको माद्रिदचे प्रतिनिधित्व करतो. करोना झाल्यामुळे तो शनिवारी बार्सिलोनाविरुद्ध होणाऱ्या लढतीलाही मुकणार आहे. बार्सिलोना संघ सोडल्यानंतर सुआरेझला प्रथमच त्याच्या जुन्या संघाविरुद्ध खेळण्याची संधी होती.

सुआरेझप्रमाणेच उरुग्वेचा गोलरक्षक रॉड्रिगो मुनोझदेखील ब्राझीलविरुद्धच्या लढतीपूर्वी करण्यात आलेल्या चाचणीत करोनाबाधित आढळला. याआधी शनिवारी उरुग्वेचा बचावपटू मॅटियास विनालादेखील करोना संसर्ग झाल्याचे आढळले होते.

ब्राझीलविरुद्धची लढत उरुग्वेसाठी निश्चित महत्त्वपूर्ण आहे. उरुग्वेने २००१ नंतर ब्राझीलला नमवलेले नाही. त्यातच ब्राझील दक्षिण अमेरिकेच्या गटातून तीन सामन्यांतून ९ गुणांसह अव्वल स्थानी आहे. उरुग्वेकडे सहा गुण आहेत.

अल्जेरिया आफ्रिका चषकासाठी पात्र

नेशन्स चषक फुटबॉल स्पर्धा

केपटाऊन : झिम्बाब्वेविरुद्धच्या लढतीत २-२ अशी बरोबरी होऊनही अल्जेरिया २०२२मध्ये होणाऱ्या आफ्रिका नेशन्स चषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. ३८व्या मिनिटापर्यंत २-० अशी आघाडी घेऊनही अल्जेरिया विजयाची नोंद करू शकला नाही. याबरोबरच अल्जेरियाला नेशन्स चषकाचे विजेतेपद राखण्याचीही संधी मिळाली आहे. ही स्पर्धा २०२१ मध्ये होणार होती. मात्र करोना साथीमुळे ही स्पर्धा जानेवारी-फेब्रुवारी २०२२मध्ये खेळवण्यात येणार आहे.

‘ईपीएल’मध्ये १६ जणांना करोना

लंडन : इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये (ईपीएल) नुकत्याच करण्यात आलेल्या करोना चाचणीत १६ जणांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. त्यामध्ये संघातील खेळाडूंसह साहाय्यक मार्गदर्शकांचाही समावेश आहे. एकाच आठवडय़ात इतक्या मोठय़ा संख्येने करोनाबाधित आढळणाऱ्यांची ही पहिलीच वेळ ठरली आहे. करोना संसर्ग झालेल्यांची नावे जाहीर करण्यात आली नसून त्यांना १० दिवसांचे विलगीकरण सक्तीचे आहे. ९ ते १५ नोव्हेंबरदरम्यान ‘ईपीएल’मध्ये एकूण १२०७ खेळाडूंची आणि साहाय्यक मार्गदर्शकांची करोना चाचणी घेण्यात आली आहे.

अर्जेटिनाचे प्रशिक्षकही करोनाबाधित

अर्जेटिना फुटबॉल संघाचे प्रशिक्षक जॉर्ज सॅम्पाओली यांनादेखील करोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यासह ब्राझीलमधील अव्वल फुटबॉल संघ अ‍ॅटलेटिको मिनियेरो या संघातील एकूण ९ जण करोनाबाधित आढळले आहेत.  या सर्वामध्ये सौम्य लक्षणे आहेत.