सुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेत भारताने आज आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे. दोन पराभव आणि एका सामन्यात बरोबरी साधल्यानंतर भारताच्या अंतिम फेरीत पोहचण्याच्या आशा जवळपास मावळल्या होत्या. मात्र आज झालेल्या चौथ्या सामन्यात भारताने यजमान मलेशियाचा ५-१ असा फडशा पाडला. या विजयासह भारतासाठी पुन्हा एकदा पदकाच्या आशा निर्माण झाल्या आहेत. मात्र यासाठी भारताला मलेशिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामन्याच्या निकालावर अवलंबून रहावं लागणार आहे.

भारताच्या तरुण खेळाडूंनी आज झालेल्या सामन्यात पुन्हा एकदा आश्वासक खेळ केला. शिलानंल लाक्राने सामन्यात दहाव्या मिनीटाला गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर भारतीय खेळाडूंनी यजमान मलेशियाला चांगलचं झुंजवलं. उत्कृष्ट आक्रमक, भक्कम बचाव या जोरावर मध्यांतरापर्यंत भारताने आपली १-० ही आघाडी कायम राखली होती. आपल्या याआधीच्या साखळी सामन्यात चांगला खेळ करणारा मलेशियाचा संघ भारताविरुद्ध आपल्या नेहमीच्या गतीत दिसत नव्हता.

मध्यांतरानंतर पहिल्या सत्रात मलेशियाने आक्रमणाची धार आणखी वाढवत भारताच्या गोलपोस्टवर हल्ला करायला सुरुवात केली. याचा फायदा घेत ३३ व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नवर फैजल सारीने गोल करत मलेशियाला सामन्यात बरोबरी मिळवून दिली. याआधी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही भारताला १-० अशा आघाडीवरुन १-१ अशा बरोबरीत समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळे मलेशियाविरुद्धच्या सामन्यात या इतिहासाची पुनरावृत्ती होते की काय अशी शक्यता निर्माण झाली होती.

मात्र भारतीय खेळाडूंनी सामन्यावरची आपली पकड ढिली होऊ दिली नाही. गुरजंत सिंह, सुमीत कुमार आणि रमणदीप सिंह या आघाडीच्या फळीतल्या खेळाडूंना चांगल्या चाली रचत एकामागोमाग एक गोल करण्याचा धडाका चालू ठेवला. भारताच्या या आक्रमक खेळापुढे मलेशियाचे खेळाडू पुरते भांबावून गेलेले पहायला मिळाले. अखेर या सामन्यात भारताने ५-१ या फरकाने मलेशियावर मात करत आपला पहिला विजय मिळवला. या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे.